Startup : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने शिवाजी विद्यापीठात 14 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रा जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण संकल्पना असणाऱ्या व्यक्तींनी (स्टार्टअप) www.msins.in किंवा www.mahastartupyatra.in या वेबसाईटवर नवकल्पना नोंदवून शिबीरात आपला सहभाग निश्चित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार व कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.
नोंदणीकृत नवकल्पनांचे सादरीकरण करण्यासाठी दिनांक 14 ऑक्टोबर रोजी तंत्रज्ञान विभाग (डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी) शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे सकाळी 10 वाजता एकदिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण सत्र होणार आहे. यात पहिल्या सत्रामध्ये विभागाच्या विविध योजनांची माहिती, स्टार्टअपच्या प्रवासातील टप्पे याबाबत मार्गदर्शन व स्थानिक उद्योजकांची व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. दुसऱ्या सत्रामध्ये दुपारी 12 वाजता सादरीकरणाची संधी देण्यात येईल. नोंदणी केलेल्या उमेदवार, उद्योजकांनी सादरीकरणाच्या वेळी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
प्रत्येक जिल्ह्यामधून अव्वल 3 विजेते घोषित केले जातील. यामध्ये कृषी, शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास (कचरा व्यवस्थापन, स्वच्छ पाणी, उर्जा अशा सर्व क्षेत्रांचा समावेश असेल. ई-प्रशासन, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता, इतर कुठलीही समस्या व त्यावरील नाविन्यपूर्ण उपाय यावर सादरीकरण असावे. राज्यस्तरीय विजेत्यांना रोख अनुदान तसेच इनक्युबेशन सहाय्य, बीज भांडवल/निधीसाठी सहाय्य, नाविन्यता परिसंस्थेतील महत्वाच्या संस्था व तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन सत्रे तसेच सॉफ्टवेअर क्रेडिट्स, क्लाऊड क्रेडिट्स यासारखे लाभ पुरवण्यात येणार आहेत.
अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दूरध्वनी क्रमांक 0231-2545677 येथे संपर्क साधावा. स्टार्टअप यात्रेकरीता वयाची कोणतीही अट नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजक, विद्यार्थी व नाविन्यता परिसंस्था यांनी सहभाग घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सादरीकरण स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हास्तरीय पहिल्या क्रमांकाचे 25 हजार रुपये, दुसऱ्या क्रमांकाचे 15 हजार रुपये, तर क्रमांकाला 10 हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील सर्वोत्तम सादरीकरणातून राज्यस्तरावर निवड करण्यात येणार आहे. राज्यस्तरावर प्रत्येक सेक्टर मधून महिला उद्योजिका, प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक अशी निवड केली जाणार आहे. त्यांना अनुक्रमे 1 लाख रुपये, 1 लाख रुपये व 75 हजार रुपये अशी 21 बक्षिसे दिली जाणार आहेत.