Kolhapur News : लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने आणि अजरामर कर्तृत्वाने पावन झालेल्या कोल्हापूरने राज्यालाच नव्हे, तर देशाला पुरोगामी वाटचालीचा वारसा घालून दिला आहे. कोल्हापूरने काही दिवसांपूर्वी विधवा प्रथा बंदीचा पॅटर्न घालून दिल्यानंतर आता या विधायक उपक्रमावर कळस ठरेल, असा आदर्श अवघ्या बारावी शिकलेल्या शिंगणापुरातील तरुणाने घालून दिला आहे. वडिलांचे अकाली छत्र हरवल्यानंतर युवराज शेले या तरुणाने आईच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसण्यासाठी दुसरा विवाह लावून दिला.


राजकीय नेत्यांकडून तोंडाला लावण्यापुरता पुरोगामी बाणा मिरवला जात असताना कोणाच्या खिजगणतीतही नसलेल्या युवराजने घेतलेल्या निर्णयाने त्याची आई सुखावली आहेच, पण आपल्यासारखं लेकरु प्रत्येक आईला लाभावं अशी प्रांजळ भावना डोळे भरुन व्यक्त केल्या. राजर्षी शाहूंच्या भूमीत पुरोगामी विचाराला दिश देतील, अशा अनेक सुखद घटना घडल्या आहेत. शाहूंनी आंतरजातीय विवाह लावून दिल्यापासून ते आतापर्यंत या भूमीत अनेक आंतररजातीय आणि आंतरधर्मीय विवाह झाले आहेत. हे करताना आपली जात धर्म न बदलता गुण्यागोविंदाने संसार केला आहे. या सर्व वाटचालींमध्ये युवराजची कृती या पुरोगामी वाटचालीवर कळस ठरावी अशीच आहे असे म्हणावं लागेल. गावात राहत असूनही त्याने गावच्या लोकांची भीती न बाळगता लग्नामध्ये गावकऱ्यांनाही सामील करत आईच्या मनातील अनामिक भीती दूर केली. 


वडिलांचा अकाली अपघाती मृत्यू 


युवराजची आई आणि वडिलांचा विवाह 25 वर्षांपूर्वी झाला. युवराजचे वडील नारायण सेंट्रिंग काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र, युवराजचे शिक्षण सुरु असतानाच वडील नारायण यांचा अपघातात अकाली मृत्यू झाल्याने शेले कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. तेव्हापासून युवराची आई एकांतवासात गेली होती. आईची अशी अवस्था पाहून युवराज हताश झाला होता. त्यामुळे त्याने पहिल्यांदा आईला दुसऱ्या विवाहाची बोलून दाखवल्यानंतर तिने कडाडून विरोध केला. मात्र, युवराजने हार न मानता आईची समजूत काढण्यास सुरुवात केली. अखेर त्याला यश आले आणि आई दुसऱ्या विवाहासाठी तयार झाली. 


असा योग जुळून आला


आईची समजूत घातल्यानंतर पाहुण्यांमधील घटस्फोटित मारुती व्हटकर आईसाठी योग्य जोडीदार वाटल्यानंतर विवाहाची बोलणी सुरु झाली. आईची समजूत काढल्यानंतर आई तयार झाली. त्याने या निर्णयामध्ये गल्लीमधील काही महिलांशी बोलून आपल्या निर्णयाची माहिती दिली. या महिलांनी युवराजला पाठिंबा दिला. त्यामुळे 12 जानेवारीला विवाह पार पडला. पुरोगामी भूमिकेवर गप्पा मारण्यास खूप सोप्या आहेत. किंबहुना त्या काहीवेळा त्या भरल्या पोटावरील गप्पा वाटू लागल्या आहेत. त्यामुळे युवराजने आईसाठी उचललेलं पाऊल निश्चितच कोल्हापूरच्या पुरोगामी वाटचालीत मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही.  


इतर महत्वाच्या बातम्या