Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील घाटकरवाडीत आजरा-आंबोली मार्गावर पोलिसांनी सापळा रचून व्हेल माशाची उलटी (Ambergris also known as Whale Vomit) जप्त केली. दोन किलो वजनाची ही उलटी असून याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत २ कोटी रुपये इतकी किंमत आहे. याप्रकरणी सहाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. आजरा पोलिस व वनविभागाने संयुक्तपणे कारवाई केली. 


आजरा-आंबोली मार्गावर दोन चारचाकीतून व्हेल माशाच्या उलटीची तस्करी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घाटकरवाडी येथे सापळा रचला होता. पोलिसांनी (एमएच07- एजी 2467) व (जीए 11 ए 4631) या चारचाकी गाड्यांना पोलिसांनी थांबवले. संशयास्पद हालचालीमुळे झडती घेण्यात आल्यानंतर एका प्लस्टिकच्या पिशवीत उलटी मिळाली. यामध्ये व्हेल माशाची उलटी पॅकबंद ठेवली होती. 


पोलिस उपअधीक्षक डॉ. नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे, आजरा परिक्षेत्र वनाधिकारी स्मिता डाके, पोलिस उपनिरीक्षक युवराज जाधव, वनपाल बाळेश न्हावी, पोलिस नाईक प्रशांत पाटील, विशाल कांबळे, अजित हट्टी, भाग्यश्री चौगुले यांनी ही कारवाई केली. 


यापूर्वी, गेल्या नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीला आठवडाभरात दोनवेळा व्हेल माशाची उलटी जप्त (Ambergris also known as Whale Vomit) करण्यात आली होती. कोल्हापूर पोलिसांनी तब्बल साडे पाच कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त केली होती. पोलिसांनी सापळा रचून कोल्हापुरात परीख पुलानजीक व्हेल माशांची उलटी घेऊन चाललेल्या तिघांना सापळा रचून बेड्या ठोकत 2 किलो 15 ग्रॅम उलटी जप्त केली होती. बाजारात याची किंमत तब्बल 2 कोटी 1 लाख रुपये इतकी आहे. तत्पूर्वी, कारवाई करताना कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना जेरबंद करत तब्बल 3.41 कोटी रुपये किमतींची 3 किलो 413 ग्रॅम व्हेल माशाची उलटी जप्त केली होती. 


व्हेल माशाची उलटी अतिशय मौल्यवान 


व्हेल माशाची उलटी केवळ बाजारात विकली जात नाही, तर ती कोणत्याही हिऱ्यापेक्षाही अधिक मौल्यवान आहे. व्हेल मासा हा पृथ्वीवरील असा जीव आहे, ज्याच्या उलटीला तरंगणारे सोने म्हणतात. व्हेल माशाच्या उलटी अॅम्बरग्रीस (Ambergris) या नावानेही ओळखली जाते. तज्ञांच्या मते, त्याला विष्ठा म्हणतात. म्हणजेच व्हेलच्या शरीरातून बाहेर पडणारा टाकाऊ पदार्थ. वास्तविक ते व्हेलच्या आतड्यातून बाहेर पडते. व्हेल मासे समुद्रातील अनेक गोष्टी खातात. यामुळे, जेव्हा त्यांना त्या गोष्टी पचवता येत नाहीत तेव्हा ती बाहेर टाकते. अ‍ॅम्बरग्रीस हे राखाडी किंवा काळ्या रंगाचे घन असते. एकप्रकारे तो मेणापासून बनलेला दगडासारखा पदार्थ आहे.


इतर महत्वाच्या बातम्या