Pune-Bangalore National Highway : सातारा ते कागल टप्प्याचे सहापदरीकरण काम पूर्ण क्षमतेने सुरु झाले आहे.  सातारा ते कागल या सहापदरीकरणाचे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (National Highways Authority of India) करण्यात येणार आहे. सातारा ते कागल दरम्यानचा 133 किमीचा राष्ट्रीय महामार्गा जानेवारी 2025 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. सहा पदरी करण्याचे काम दोन टप्प्यात देण्यात आले आहेत. त्यामध्ये एक शेंद्रे (सातारा येथील) ते पेठ नाका दरम्यान आणि दुसरा पेठ नाका ते कागल दरम्यान आहे. 


सातारा-कागल राष्ट्रीय महामार्गाचे काम ‘बीओटी’ तत्त्वावर


दरम्यान, सहापदरीकरणाचे (Pune-Bangalore National Highway) काम बीओटी तत्त्वावर पूर्ण केलं जाणार आहे. सहापदरीकरणासाठी 3 हजार 255 कोटींचा आहे. दोन ठेकेदार कंपन्यांनी गुंतवलेली रक्कम ‘टोल’च्या माध्यमातून वसूल करेल. टोलसाठी सातारा जिल्ह्यातील तासवडे व कोल्हापूर जिल्ह्यातील किणी असे दोन टोल नाके आहेत.


अपघातप्रवण भागात उड्डाणपूल 


येवलेवाडी फाटा, नेर्ले, काळमवाडी, केदारवाडी फाटा, वाघवाडी फाटा, कामेरी आणि येलूर या अपघातप्रवण भागात उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. तर कासेगाव आणि पेठ नाका येथील सध्याचे उड्डाणपूल तसेच राहतील. लवकरच महामार्गावरील मोठ्या गावांच्या ठिकाणी उड्डाणपुलांचे काम सुरू होणार आहे. वाळवा तालुक्यातील कासेगाव रोडवरील काही घरेही काढावी लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. 


कागल सातारा सेवा रस्त्यानेही जोडली जाणार 


दरम्यान, सातारा ते कागल दोन्ही शहरे दुतर्फा सेवा रस्त्याने जोडली जाणार आहेत. स्थानिक वाहतूक या रस्त्यानेच व्हावी, हा त्यामागे उद्देश आहे. त्यामुळे महामार्गावरील प्रवास सुरक्षित होईल. दुसरीकडे, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात उद्‌भवलेल्या पूर परिस्थितीचा अभ्यासही करण्यात आला आहे. तांदूळवाडी ते कणेगाव, किणी टोल नाका परिसर, शिरोलीजवळ सांगली फाटा येथे पुराचे पाणी येते. दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुरात महामार्गावर ((Pune-Bangalore National Highway) तब्बल 12 दिवस वाहतूक खोळंबली होती. यावर कायमस्वरुपी उपाययोजनेचा प्रयत्न आहे. तेथे रस्त्याची उंची वाढवण्यात येणार आहे.


सध्या या महामार्गाच्या सहापदरीकरणाऱ्या कामासाठी मोठी झाडे काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काही ठिकाणी सर्व्हिस रोडवरही झाडे तोडली जात आहेत. सध्या सुरू असलेल्या महामार्गालगतची मोठी झाडे हटविल्यानंतर सर्व्हिस रोडची कामे हाती घेतली जाणार आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या