Kolhapur News: कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी लावण्यात आलेल्या आक्षेपार्ह स्टेटसमुळे आज (7 जून) हिदुत्ववादी संघटनेला पुकारलेला बंद आणि केलेल्या ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. मंगळवारी (6 जून) दुपारी आक्षेपार्ह स्टेट्स आणि कोल्हापूर शहरात व्हायरल मेसेजवरुन परिस्थितीचा अंदाज असतानाही पोलीस यंत्रणेला हिंसक जमावाला पांगवण्यासाठी तब्बल अडीच तास झुंजावे लागले. कोल्हापूर पोलिसांच्या फौजफाट्यासह कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी सुनील फुलारी यांनाही रस्त्यार उतरावे लागले, यावरुन परिस्थितीचा अंदाज येतो. आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यांपैकी सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. मात्र, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी कोणताही आकडा सांगितला नाही. 


हिंदुत्ववाद्यांचा शिवाजी चौकात ठिय्या 


काल आक्षेपार्ह व्हाॅट्सअॅप स्टेटस व्हायरल झाल्यानंतर कोल्हापुरात संतप्त पडसाद उमटले होते. यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी बंदी आदेश झुगारुन आज आंदोलनाची घोषणा केली होती. आज सकाळपासून शिवाजी चौकात हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांस तरुण जमण्यास सुरुवात झाली. पाहता पाहता शिवाजी चौकात मोठी गर्दी झाली. यावेळी पोलीस प्रशासनाकडून ठिय्या आंदोलन जितक्या वेळ हवं तितकं करता येईल, पण मोर्चाला परवानगी दिली जाणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. कार्यकर्ते मोर्चा काढण्यावर ठाम होते. यावेळी मोर्चावरुन दोन गट झाल्याचेही दिसून आले. 


ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण


शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन सुरु असतानाच सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्याने दगडफेक करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. शिवाजी चौकापासून जवळच असलेल्या, माळकर तिकटी, महाद्वार रोड, बारा इमाम, शिवाजी रोड, अकबर मोहल्ला परिसरात जमावाकडून तोडफोड करण्यात आली. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली. 


पोलिसांकडून लाठीमार 


हुल्लडबाजांकडून दगडफेक सुर झाल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत नियंत्रण मिळवण्यास सुरु केली. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांना लाठीचार्ज सुरु केल्यानंतर रस्त्यावरून एकच पळापळ सुरु झाली. त्यामुळे रस्त्यावर चपलांचा खच पडला. पोलिसांनी साडे अकराच्या सुमारास परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. मात्र, काही वेळाने चिंचोळ्या भागात लपून बसलेल्या तरुणांनी पुन्हा हुल्लडबाजी सुरु केली. त्यामुळे पोलिसांनी हुल्लडबाजांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. 


आयजी शिवाजी चौकात पोहोचले


तणावाची स्थिती लक्षात घेता राज्याच्या गृह विभागाकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आल्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी सुनील फुलारी हे स्वतः शिवाजी चौकामध्ये रस्त्यावर उतरले. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, परिस्थिती नियंत्रणात आहे. जे पोलीस रस्त्यावर होते त्यांनी परिणामकारकपणे कारवाई केली आहे. यासंदर्भात आतापर्यंत सहा जणांना अटक माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर जे  रस्त्यावर उतरले ते कोण आहेत याची माहिती घेत असल्याचे त्यांनी सांगितले. 


इंटरनेट बंदीचा आदेश


पोलिसांनी केलेल्या बळाच्या वापरानंतर रस्त्यावर पळापळ आणि चपलांचा ढीग दिसून आला. कोल्हापूरमध्ये सोशल मीडियामधून कुठल्या प्रकारचे आक्षेपार्ह मेसेज व्हायरल होऊ नयेत यासाठी कोल्हापूर पोलिसांकडून आता मोबाईल इंटरनेट सेवा खंडित करण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांकडून दूरसंचार कंपन्यांना आदेश देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी सुनील फुलारी यांनी दिली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या