Karnataka Bhawan in Kaneri Math : कर्नाटककडून महाराष्ट्राविरोधात चिथावणीखोर वक्तव्ये सुरु असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील तब्बल 1300 वर्षांची परंपरा असलेल्या कणेरी मठात कर्नाटक भवनची निर्मिती होत आहे. या कर्नाटक भवनसाठी बेताल वक्तव्ये करणाऱ्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीच केली आहे. त्यामुळे या कर्नाटक भवनला शिवसेनेनं कडाडून विरोध केला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी कर्नाटक नाव कणेरी मठात लागणार नाही याची शपथ आम्ही घेतल्याचे सांगताच थेट इशारा दिला आहे. कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, याची दक्षता जिल्हाधिकारी यांनी घ्यावी, असा इशाराही त्यांनी दिला. 


संजय पवार म्हणाले, मुंबई कोणाच्या बापाची नाही, ते आमचं नाक आहे. कर्नाटक विधासभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन वक्तव्य केली जातात. कर्नाटकच्या नेत्यांना महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही. विकासासाठी कितीही पैसे द्या आम्ही स्वागत करू. राष्ट्रपती, पंतप्रधान कणेरी मठावर आले तर स्वागतच आहे, पण कोणत्याही परिस्थितीत कर्नाटक भवन होऊ देणार नाही. कर्नाटक नाव कणेरी मठात लागणार नाही याची शपथ आम्ही घेतली आहे. 


बोम्मई यांची महाराष्ट्राविरोधात बेताल वक्तव्ये सुरु असतानाच कर्नाटकमधील मंत्र्याने मुंबईला केंद्रशासित करा, अशी मागणी केल्यानंतर संतापात आणखी भर पडली आहे. बसवराज बोम्मई यांनी 10 ऑक्टोबर रोजी सिद्धगिरी कणेरी मठात कर्नाटक भवन उभारणीसाठी पायाभरणी केली आहे. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी.एल. संतोष, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, शशिकला जोल्ले आणि बोम्मई मंत्रिमंडळातील 10 मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते. कर्नाटक भवनासाठी एकूण 7 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या कामासाठी तातडीने 3 कोटी रुपये दिले जातील, असेही त्यांनी म्हटले होते. 


कणेरी मठातील 'सुमंगलम' महोत्सवास सुद्धा बोम्मईंना निमंत्रण


दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान कणेरी मठात होणाऱ्या सुमंगल पंचमभूत महोत्सवाचे निमंत्रण सुद्धा बसवराज बोम्मई यांना देण्यात आले आहे. हे निमंत्रण स्वीकारल्यास पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व्यासपीठावर असतील. काडसिद्धेश्वर महाराज यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मठात दररोज सुमारे 5 लाख लोक येतील आणि 1 लाखांहून अधिक पर्यटकांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे. 


बोम्मई यांनाही निमंत्रित करण्यात आले असून मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची तयारी दर्शवली आहे. सीमावादावर आणि महाराष्ट्राविरोधात सातत्याने चिथावणीखोर वक्तव्ये करत सुटलेल्या बोम्मई यांना निमंत्रण दिल्याने भूवया उंचावल्या आहेत. कणेरी मठ काडसिद्धेश्वर महाराज चालवतात. मठात महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पर्यटक तसेच भाविक मोठ्या संख्येने येत असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, अण्णा हजारे, योगगुरू बाबा रामदेव आणि इतर अनेक व्यक्तींनी यापूर्वी मठाला भेट दिली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या