Rajesh Kshirsagar on Shatipeeth Expressway: कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शक्तिपीठ महामार्गाला प्रचंड विरोध आहे असं विरोधकांकडून सांगण्यात येतं आहे. दुसरीकडे, आज (19 जुलै) कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर शक्तिपीठ महामार्गाला समर्थन देण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले. या शेतकऱ्यांनी आपल्या हातामध्ये सातबारा उतारे घेतले होते.
शेतीला पाचपट मोबदला पाहिजे, मोर्चातील शेतकऱ्यांची मागणी
दरम्यान, शक्तिपीठ मोर्चाला समर्थन देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी पाचपट मोबदला मिळणार असल्यास शेती देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. विरोधक शक्तीपीठ महामार्गाचे राजकारण करत असून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे विरोधकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या कोणी आडवा आल्यास मी आडवा उभा राहणार असल्याचे क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांना बेस्ट रेट देण्याचे आश्वासन दिले आहे. ज्या शिरोळ तालुक्यामधून शक्तिपीठ महामार्गाला विरोध आहे असं सांगण्यात येतं, त्याच शिरोळ तालुक्यातील 80 टक्के शेतकरी सातबारा उतारे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करूया असेही आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले.
जयप्रभा स्टुडीओमधील जागा शेतकऱ्यांच्या नावावर करा
दरम्यान, शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून आमदार राजेश क्षीरसागर गैरसमज पसरवत आहेत. राजेश क्षीरसागर यांना शक्तीपीठ महामार्गास जमीन पाहिजे असल्यास त्या बदल्यात त्यांच्या मालकीची जयप्रभा स्टुडीओमधील जागा शेतकऱ्यांच्या नावावर करण्याची मागणी निमशिरगांव (ता. शिरोळ) येथील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी केली. शिरोळ तालुक्यातील ज्या गावातून शक्तीपीठ महामार्ग जातो त्याठिकाणी 70 टक्के शेतकऱ्यांचे समर्थन असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुंबईत दिली. निमशिरगांव गावातील सर्व बाधित शेतकरी एकत्रित येत शक्तीपीठ महामार्गास कडाडून विरोध केला. यावेळी ग्रामपंचायत सरपंच सौ. अश्विनी गुरव यांना निवेदन देवून सदरचे निवेदन बाधित शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. राजेश क्षीरसागर यांच्या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जेवढी जमीन शक्तीपीठ महामार्गास जाणार आहे तेवढीच त्याबदलात जयप्रभा स्टुडीओची जागा जर राजेश क्षीरसागर शेतकऱ्यांच्या नावावर करत असतील तर खुशाल जमीनी घ्याव्यात अशा पध्दतीची मागणी करण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या