Thackeray Faction Morcha on Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या संगनमताने होत असलेल्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून मनपाला दुचाकी आणि रिक्षांनी घेराव घालून निषेध करण्यात आला. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वात महापालिकेला घेराव घालण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. मोर्चामधील फलक सुद्धा लक्ष वेधून घेत होते.यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत महापालिकेचा परिसर दणाणून सोडला. विविध मागण्यांचे निवेदन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना देण्यात आले. यावेळी महापालिकेच्या एकूणच कारभारावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी टीका केली.
आयुक्तांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे
रविकिरण इंगवले म्हणाले की महापालिकेत भ्रष्टाचाराची स्पर्धा सुरु झाली आहे. कोण जास्त भ्रष्टाचार करेल त्याला जास्त पारितोषिक अशी स्थिती निर्माण झाली आहे. मनपामधील अधिकारी वर्ग भ्रष्ट झाला असून यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक नको आहेत. 85 लाखांचा घोटाळा हा कोल्हापुरातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी संगनमतानं केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी पुढे सांगितले की, 100 कोटींचे रस्ते धुळ खात पडले आहेत. फिर्यादीला आरोपी केल्याचे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, बावड्यातील ड्रेनेज घोटाळ्यात कोल्हापूर मनपा आयुक्तांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे, जर कारवाई होत नसेल, तर चुकीचं असल्याचे म्हणाले. 85 लाखांचा घोटाळा हा जोक नसल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेला घालण्यात आलेला घेराव हा कोल्हापूरच्या जनतेला जाग आणण्यासाठी होता, असेही ते म्हणाले.
दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी करण्याचे धाडस दाखवणार?
दरम्यान, बावड्यातील ड्रेनेज घोटाळ्यातील संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर व शहर अभियंता रमेश मस्कर यांची नियुक्ती केली. या चौकशी समितीला 48 तासात अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. या समितीने प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर केला. तथापि, मनपा प्रशासकांना अहवाल प्राप्त झाल्यानंतर अजून कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या अहवालाचे काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार आज (4 ऑगस्ट) चौकशी समिती अहवाल समोर येणार असून प्रशासक काय निर्णय घेतात? याकडे लक्ष असेल.
अधिकाऱ्यांवर जाहीर टक्केवारीचा आरोप झाल्याने शहरवासियांमध्ये संतापाची लाट असताना मनपा प्रशासनाकडून अजून कोणतीच थेट कारवाई करण्यात आलेली नाही. महापालिकेटी ज्या पद्धतीने लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत ते पाहता तातडीने हालचाल करून संबंधितांना धडा शिकवण्याची गरज होती. मात्र, अजूनही कारवाईला वेग आला नसल्याने एकंदरीत कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे शहर अभियंता पदावरून मनपात 'मस्करी' रंगली ती पाहता प्रकरण दडपण्यासाठी तर प्रयत्न होत नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या