कोल्हापूर : सर्वांनी मिळून पीएम मोदी यांचा पराभव करूया, नाही तर देशामध्ये हुकूमशाही येईल, असे प्रतिपादन शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बहिण सरोज पाटील यांनी केले. सरोज पाटील (Saroj Patil) स्वर्गीय एन. डी. पाटील सर यांच्या पत्नी आहेत. त्यांनी आज निर्भय बनो कार्यक्रमामध्ये बोलताना भावना व्यक्त केल्या. 


निर्भय बनोच्या माध्यमातून डिसेंबर सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, विधीज्ञ असीम सरोदे तसेच ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे महाराष्ट्रभर दौरे करून नागरिकांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही बुलंद करण्यासाठी जागृत करत आहेत. हा कार्यक्रम आज कोल्हापूरमधील दसरा चौकामध्ये पार पडला. या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसकडून निश्चित झालेले श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते. यावेळी त्यांनी व्यासपीठावर न जाता प्रेक्षकांमध्ये बसणे पसंत केले. आमदार जयश्री जाधव, उमा पानसरे सुद्धा कार्यक्रमास उपस्थित होत्या. 


आपल्या आईने आपल्याला लढायला शिकवलं, रडायला नाही 


यावेळी, बोलताना सरोज पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर कुटुंबावर आलेल्या संकटावर भाष्य केलं. त्या म्हणाल्या की, जेव्हा आमचे घर फोडलं त्यावेळी अत्यंत वाईट वाटलं. दिवसभर माझ्या डोळ्यांमधील पाणी हटत नव्हतं. तेव्हा शरदचा (शरद पवार) फोन आला. शरद म्हणाला की, रडत काय बसतेस आपल्या आईने आपल्याला लढायला शिकवलं, रडायला नाही. त्यामुळे जीवात जीव असेल तोपर्यंत लढायचं असं शरद म्हणाला. त्यामुळे सर्वांनी मिळून मोदींना हरवू, नाहीतर या देशांमध्ये हुकूमशाही येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या