Sharad Pawar Retirement: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टाकलेल्या राजकीय बाँम्बनंतर राज्यासह देशाच्या राजकारणात हादरे बसले आहेत. त्यांच्या निर्णयाने पवार कुटुंबीय सुद्धा द्विधा मन:स्थितीत असल्याचे दिसून आले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या निवृत्तीच्या निर्णयावर त्यांच्या बहिण स्वर्गीय एन. डी. पाटील सर यांच्या पत्नी सरोज पाटील (Saroj Patil on Sharad Pawar Retirement) यांची द्विधा अवस्था झाली आहे. एकीकडे देशातील वातावरण खराब असताना देशाला पवारांची फार गरज, त्यामुळे पवारांनी निवृत्तीचा निर्णय परत घ्यावा, पण दुसऱ्या बाजूने बहिण या नात्याने शरद पवार आम्हाला खूप वर्ष हवे आहेत, त्यांची प्रकृती चांगली राहिली पाहिजे, म्हणून खूप वर्ष शरद पवार जगलेही पाहिजेत अशीही आमची स्वार्थी भावना असल्याचे मत शरद पवार यांच्या बहिण सरोज पाटील यांनी व्यक्त केले. 


विशेष म्हणजे, पवारांच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या निवृत्तीच्या निर्णयाने महाराष्ट्राचे खूप नुकसान होईलच, पण राष्ट्रवादी पक्षही दुबळा होईल, अशी भीतीही सरोज पाटील यांनी व्यक्त केली. देशातील वातावरण गढूळ, अस्वस्थ असताना  अचानक शरद पवार साहेबांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा देणे याचं मलाही अतिशय दुःख वाटत असल्याची सरोज पाटील यांनी व्यक्त केली. 


नेमक्या काय म्हणाल्या सरोज पाटील?


सध्या देशामधील लोकशाही जगते की नाही? असा प्रश्न पडला आहे. आम्ही पुढील पिढीला काय देणार? असाही प्रश्न पडतो. जातीजातीत तेढ निर्माण केला जात आहे आणि हे अतिशय अस्वस्थ वातावरण असताना अचानक शरद पवारांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला हा खूप मोठा धक्का आहे. लोक रडतायेत, अस्वस्थ झालेत. एखादी मोठी व्यक्ती गेल्यानंतर जसं वातावरण निर्माण होते तसं अत्यंत दुःखदायक असं वातावरण निर्माण झालं आहे. लोकांना हा धक्का पचेना आणि त्यांनी आतापासूनच मोर्चे, निदर्शने काढायला आणि राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे. 


कठीण परिस्थितीत शरद पवार यांनी आपला पक्ष सांभाळला. सगळे साथीदार निघून गेले, तरी ते कधी डगमगले नाहीत. त्यामुळे आज तर संविधान सगळं पायदळी तुडवले जात असताना शरद पवार यांच्या नेतृत्वाची देशाला खूप गरज आहे. शरद पवारांसारखा खंदा विरोधी पक्ष नेता दुसरा कोणी दिसत नाही. शरद पवार यांनी कधीही कितीही आपल्यावर टीका केली, तरी त्याला कधीही त्यानी वाईट शब्दांमध्ये उत्तर दिले नाही. त्यामुळे अशा नेतृत्वाने अजूनही राजकारणात आणि देशाच्या मदतीसाठी सक्रिय राहावं असं वाटतं. पण शरद पवार नेहमी म्हणतात की कोणत्याही गोष्टीचा मोह होता कामा नये.


मग अध्यक्षपदाचा राजीनामा किंवा खूर्ची सोडावी


मी पुष्कळ वर्ष या पदाच्या खुर्चीवर बसलोय जे पवार म्हणतात ते ही खरे आहे. कारण शरद पवार यांची आता प्रकृती पण थोडीशी साथ देत नाही, वय वाढतं आहे. त्यांचं म्हणणं कायम असते की पर्यायी माणूस तयार व्हायला पाहिजे, पण शरद पवारांनी आधी तुमच्यासारखेच नेतृत्व तयार करावे आणि मग अध्यक्षपदाचा राजीनामा किंवा खूर्ची सोडावी. अजून आमच्या समोर तरी तुमच्यासारखा नेता दिसत नाही. पवार यांच्या निर्णयाने  महाराष्ट्राचे तरी खूप नुकसान होईलच पण राष्ट्रवादी पक्ष दुबळा होईल. तेव्हा पक्षाच्या, पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना ओळखाव्यात आणि आपला राजीनामा पवारांनी परत घ्यावा असं मला वाटतं. पण दुसऱ्या बाजूने बहिणी या नात्याने असे वाटते की शरद पवार आम्हाला खूप वर्ष हवे आहेत. त्यासाठी त्याची प्रकृती नेहमी चांगली राहिली पाहिजे.आजही शरद पवार आम्हा या सगळ्या बहिण भाऊंना हवेहवेसे वाटत आहेत आणि म्हणून शरद पवार खूप वर्ष आमच्यासोबत त्यांच्या कुटुंबासोबत राहिले पाहिजेत, ही आमची दुसरी बाजूची स्वार्थी भावना देखील शरद पवारांच्या बाबतीत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या :