Kolhapur NCP: अजित पवारांच्या फुटीर गटातून आमदार हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur News) राष्ट्रवादी काँग्रेसला भगदाड पडले आहे. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यासह जिल्हा बँक संचालक, कोल्हापूरच्या माजी नगरसेवकांनी मुश्रीफ यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता शरद पवार गटाकडून पदाधिकारी निवडी सुरु करण्यात आल्या आहेत. शरद पवारांचे कोल्हापुरातील खंदे समर्थक व्ही. बी. पाटील यांच्यावर कोल्हापूर जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शरद पवार यांच्या संमतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्ही. बी. पाटील यांच्या निवडीची घोषणा केली आहे. व्ही. बी. पाटील यांच्यासमोर पक्षबांधणीचे आव्हान असणार आहे. 

Continues below advertisement


कोल्हापुरात पुन्हा पक्ष बांधून दाखवू 


ज्या शरद पवार यांनी पद, प्रतिष्ठा, नाव मिळवून दिले. त्या 'बापमाणसा'ला या वयात रस्त्यावर उतरायला लावणाऱ्यांविरोधात ताकदीने लढा देण्याचा निर्धार कोल्हापुरातील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रविवार केला. कोल्हापुरात 'राष्ट्रवादी'च्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. ज्यांना अजून पक्षातून बाहेर पडायचे आहे, त्यांनी खुशाल जावे. आम्ही नवीन निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्त्यांची फळी उभारून पक्ष संघटन मजबूत करु, असा निर्धार कार्यकर्त्यांनी यावेळी केला. 


ज्या कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन करण्याचा मुहूर्तमेढ रोवली गेली, त्याच कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. मुश्रीफ यांच्यासोबत गेलेल्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. कोल्हापुरात पुन्हा पक्ष बांधून दाखवू आणि त्यासाठीचे नियोजन येत्या रविवारी 16 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात जाहीर करू असेही व्ही.बी. पाटील यांनी मेळाव्यात बोलताना म्हणाले. शरद पवार यांना कोल्हापूर जिल्हा हा कायम महत्त्वाचा राहिला आहे. 


जिल्ह्यातील पक्षाच्या सुमारे ३ हजार सक्रिय कार्यकर्त्यांची प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात येणार असून. त्यासाठी तालुकानिहाय कार्यकर्त्यांनी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी केले. पक्ष संघटन मजबूत करण्यासह शरद पवार यांच्यासोबत भक्कम राहण्याची शपथ यावेळी सर्वांनी घेतली. यावेळी माजी आमदार राजीव आवळे, माजी जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील, शहराध्यक्ष आर के पवार, अमर चव्हाण, लखन बेराडे, नितीन जांभळे, जयकुमार शिंदे, रामराजे बदाले, चंद्रकांत वाकळे, प्रकाश पाटील, सरोजिनी जाधव, अश्‍विनी माने, जहिदा मुजावर, शिवानंद तेली, आबा पाटील, मुकुंद देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. अनिल घाटगे यांनी स्वागत केले. यावेळी रोहित पाटील, हिदायत मणेर, गणपतराव बागडी, निरंजन कदम, रमेश पोवार, शितल तिवडे आदी उपस्थित होते.


इतर महत्वाच्या बातम्या