कोल्हापूर: विशाळगडवर झालेल्या हिंसाचारानंतर (Vishalgad Violence) आता खासदार शाहू महाराज (Shahu Maharaj Kolhapur) मैदानात उतरले असून नुकसानग्रस्त झालेल्यांना तातडीने भरपाई देण्यात यावी अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. विशाळगडवर झालेली घटना म्हणजे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे अपयश असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच संभाजीराजेंनी (Chhatrapati Sambhajiraje) घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर जो हिंसाचार झाला त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो असं शाहू महाराजांनी त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे.
कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज विशाळगडाची पाहणी करणार आहेत. मंगळवारी शाहू महाराज विशाळगडाच्या परिसराची पाहणी करणार आहेत. विशाळगड परिसरात नुकसान झालेल्यांना सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत ही घटना म्हणजे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे अपयश असल्याचं शाहू महाराजांनी म्हटलं आहे.
घटनेपूर्वी आम्ही जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांना सूचना दिल्या होत्या, पण तरीही ही घटना घडल्याचं शाहू महाराजांनी म्हटलंय. या हिंसाचाराबाबत संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
काय म्हणाले शाहू महाराज?
विशाळगड किल्ल्यावरील अतिक्रमण हटवण्याच्या निमित्ताने झालेला हिंसाचार प्रचंड वेदनादायी असू आम्ही त्याचा निषेध करतो. राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराने प्रगल्भ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात अशी घटना होते हे अत्यंत क्लेशदायक आहे. यासंदर्भात प्रशासनाने माजी खासदार संभाजीराजे आणि मुख्यमंत्री यांची भेट तसेच चर्चा घडवून आणावी अशा सूचना आम्ही जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रमुखांना घटनेपूर्वी दिल्या होत्या. परंतु ते गांभीर्याने घेण्यात आलं नाही. त्यानंतर ही घटना घडली, हे प्रशासनाचे अपयश आहे.
माजी खासदार संभाजीराजे यांनी या प्रश्नी आंदोलनाचे नेतृत्व केले आणि सुरूवातीपासून आक्रमक भूमिका घेतली. परंतु त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर जो हिंसाचार झाला त्याचा आम्ही स्पष्ट शब्दात निषेध करतो.
हिंसाचारामध्ये ज्या निष्पाप लोकांचे नुकसान झाले त्याना सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी. सरकारने काहीकेलं नाही तर कोल्हापूरची जनता त्यासाठी पुढाकार घेईल.
विशाळगडावरील अतिक्रमण काढायला सुरुवात
संभाजीराजे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर आता विशाळगडावरील अतिक्रमण काढायला सुरुवात झाली आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यासह प्रमुख अधिकारी विशाळगडावर उपस्थित आहेत. विशाळगडावरील अतिक्रमण केलेली दोन आस्थापने प्रशासनाने काढली आहेत.
ही बातमी वाचा: