कोल्हापूर : लोकसभा तोंडावर आल्यानंतर देशातील राजकीय वातावरण गरम होऊ लागल्याचं दिसतंय. महाराष्ट्रात दोन्ही आघाड्यांनी अद्याप आपले पत्ते खोलले नाहीत. महाविकास आघाडीकडून 3 ते 4 जागांवर चर्चा अडली आहे. त्यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा (Kolhapur Lok Sabha Election) देखील समावेश आहे. कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj) यांच्या उमेदवारीबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.


कोल्हापुरातील नवीन राजवाड्यावर काही दिवसांपूर्वी शरद पवार पोहोचले आणि शाहू महाराजांच्या उमेदवारीची चर्चा जोर धरू लागली. शाहू महाराज कोल्हापूर लोकसभेसाठी उमेदवार असतील तर वैयक्तिकरित्या मला आनंदच होईल असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. इतकच नाही तर कोल्हापूरच्या जनतेला शाहू महाराज यांच्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत असे देखील एका जाहीर भाषणामध्ये शरद पवार म्हणाले होते. 


शिवसेनेने जागा सोडली नाही


त्यानंतर शाहू महाराज हेच महाविकास आघाडी कडून कोल्हापूर लोकसभेसाठी उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झालं. मात्र महाविकास आघाडीपैकी कोणत्या पक्षाला ही जागा मिळणार याबाबतची चर्चा सुरू होती. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने ही जागा शाहू महाराजांसाठी सोडली अशा पद्धतीची बातमी समोर आली. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेनेने कोणती जागा सोडली नसल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. 


शाहू महाराजांच्या नावावर एकमत


कोल्हापूर लोकसभेची जागा शाहू महाराज छत्रपती यांनी लढवावी याबाबत तिन्ही पक्षांमध्ये एकमत आहे. मात्र कोणत्या पक्षाच्या चिन्हावर शाहू महाराजांनी ही जागा लढवावी हे अद्याप निश्चित झालं नसल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.


काही दिवसांपूर्वीच कोल्हापुरातील महायुतीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी शाहू महाराज हे आमचे आदर्श आहेत, मात्र त्यांनी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरू नये अशा पद्धतीची भूमिका घेतली होती. तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार कुणीही असला तरी विचारांची लढाई असेल असं वक्तव्य विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी केला आहे. 


2019 साली शिवसेनेच्या धनुष्यबाणावर इथला खासदार निवडून आला. त्यामुळे ही जागा शिवसेनेच्या वाटेला मिळावी अशा पद्धतीची मागणी शिवसैनिकांनी केली आहे. त्यामुळे कोल्हापूर लोकसभेची जागा शिवसेना शाहू महाराजांसाठी सोडणार की मशालीच्या चिन्हावर शाहू महाराजांनी निवडणूक लढवावी अशा पद्धतीची मागणी करणार हे पुढच्या काही दिवसांमध्ये समोर येईल.


ही बातमी वाचा :