कोल्हापूर : कोल्हापुरात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचा सिलसिला सुरु झाला आहे. भाजपची आज (11 ऑगस्ट) जिल्ह्यातील दोन्ही जागांसाठी आढावा बैठक होत आहे. भाजपकडून आज लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत कोल्हापूर, हातकणंगले विभागाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. लोकसभा प्रवास योजना महाराष्ट्र प्रमुख माजी मंत्री बाळा भेगडे यांनी लोकसभा कोअर टीम आणि विधानसभा प्रमुखांना मार्गदर्शन केले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने 2024 मध्ये पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे अशा सूचना केल्या.  


यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, लोकसभा प्रभारी भरत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, विजय जाधव, राहुल देसाई, महेश जाधव, शौमिका महाडिक, राहूल चिकोडे, नाथाजी पाटील, सत्यजित कदम, सोनाली मगदुम, पृथ्वीराज यादव, अशोकराव माने, संजय पाटील, संग्रामसिंह कुपेकर, विजय भोजे, संदीप देसाई, संजय पाटील, विजया पाटील, प्रविण प्रभावळकर, किरण नकाते, भगवान काटे आदी उपस्थित होते. 


पृथ्वीराज चव्हाण कोल्हापूर दौऱ्यावर 


भाजपकडून बैठकांचा सिलसिला सुरु असतानाच कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेस निरीक्षक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दोन्ही मतदारसंघाच्या आढावा घेण्यासाठी  उद्यापासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शनिवारी पहिल्या दिवशी पृथ्वीराज चव्हाण हातकणंगले लोकसभा मतदार संघातील इचलकरंजी, शिरोळ व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतील. रविवारी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील करवीर, चंदगड, कोल्हापूर उत्तर, दक्षिण आणि राधानगरी विधानसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यासह पक्षाचे सर्व आमदार, तालुकाध्यक्ष व प्रमुख नेते उपस्थित रहाणार आहेत. रविवारी पत्रकार परिषद घेणार आहेत. 


आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत बैठक पार पडल्यानंतर लोकसभेसाठी स्थानिक पातळीवरील राजकीय स्थिती समजून घेण्यासाठी निरीक्षक व समन्वयक नियुक्त करण्यात आले आहेत. लोकसभा क्षेत्रातील आजी-माजी खासदार, आमदार, प्रमुख नेते, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, आघाडी संघटना विभाग व सेलचे जिल्हा पदाधिकारी यांना बैठकीत निमंत्रित करून तसा अहवाल प्रदेश काँग्रेसला पाठवायचा आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या