Hasan Mushrif ED Raid : कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील तसेच पुण्यामध्ये आज ईडीकडून दुसऱ्यांदा छापेमारी करण्यात आली. त्यामुळे आज कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या 11 तासांपासून छापेमारी सुरुच असल्याने कोल्हापुरात हसन मुश्रीफ समर्थकांकडून आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या छापेमारीचा निषेध केला आहे.
पहाटे सहाच्या सुमारास ईडीचे पथक कागलमध्ये येऊन धडकले. त्यांनी एकाच वेळी हसन मुश्रीफ यांचे निवासस्थान त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांचे निवासस्थान तसेच सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना या ठिकाणी छापेमारी केली. ही छापेमारी सुरू असताना स्थानिक पोलिसांना याबाबत कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. त्यामुळे तपास यंत्रणांनी येतानाच दिल्ली पोलिसांचा बंदोबस्त आणला होता.
छापेमारी सुरू करण्यात आल्यानंतर दिल्ली पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यानंतर छापेमारीची बातमी वाऱ्यासारखी कागल शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये पसरली. यानंतर यानंतर समर्थकांनी जमण्यास सुरुवात केली. त्यांनी भाजपसह केंद्रीय यंत्रणांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. सत्ताधाऱ्यांकडून यंत्रणेचा गैरवापर होत वापर होत असल्याचा आरोप केला.
मुश्रीफांवरील ईडी कारवाई पूर्वनियोजित
आमदार सतेज पाटील यांनीही तीव्र शब्दात निषेध केला आहे. भाजपकडून मविआ आमदारांच्या मानसिक खच्चीकरणाचा प्रयत्न असून मुश्रीफांवरील ईडी कारवाई पूर्वनियोजित असल्याचा हल्लाबोल सतेत पाटील यांनी केला. पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने केलेली कारवाई अत्यंत चुकीची आहे. केवळ सूडबुद्धीने केलेली ही कारवाई निश्चित निषेधार्ह आहे.
महाविकास आघाडीच्या आमदारांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न भाजपाकडून अशा खेळी करून केला जात आहे. मुश्रीफ यांच्यावर झालेली ईडीची कारवाई झाली हा सर्व प्रकार पूर्व नियोजित होता हे स्पष्ट आहे. ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने कसा वापर केला जातो, याचे आजची ही कारवाई म्हणजे एक उदाहरण आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
Hasan Mushrif ED Raid : हसन मुश्रीफांवर किरीट सोमय्यांचे आरोप; 'ते' प्रकरण नेमके आहे तरी काय?