Hasan Mushrif ED Raid : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी 1 जानेवारी रोजी ट्विट करताना माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना सूचक इशारा दिला होता. आता या ट्वीटनंतर पहिल्यांदा अनिल परब (Anil Parab) आणि आता मुश्रीफ यांना ईडीकडून (ED) झटका बसला आहे. ईडीकडून पहिल्यांदा अनिल परब यांची संपत्ती तात्पुरत्या स्वरुपात जप्त करण्यात आली. यानंतर आता हसन मुश्रीफ यांच्यावर कागल (Kagal) आणि पुण्यातील (Pune News) निवासस्थान तसेच सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना आणि माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या निवासस्थानी ईडीने आज पहाटेपासून छापेमारी केली आहे. ईडी आणि प्राप्तीकर विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. 


यापूर्वी जुलै 2019 मध्ये हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आणि साखर कारखान्यावर छापेमारी झाली होती. आयकर विभागाने केवळ कोल्हापुरातच नव्हे तर हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील घरीही छापेमारी केली होती. हसन मुश्रीफ यांचा मुलगा साजिद मुश्रीफ यांच्या कोंढव्यातील घरावर आयकर विभागाने छापा टाकला होता. मात्र, त्यांना काहीच सापडले नसल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला होता. 


किरीट सोमय्यांकडून कोणते आरोप?


महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप केले होते. मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मिळून 158 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. यामध्ये मुश्रीफ यांचे जावई आणि मुलगा सहभागी असल्याचेही त्यांनी म्हटले होते. 


1500 कोटी रुपयांचे कंत्राट  


दरम्यान, 2020 मध्ये पारदर्शक व्यवहार न होता अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालवण्यासाठी दिला गेला. या कंपनीस साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना या कंपनीला कंत्राट का दिले? मुश्रीफांचे जावई या कंपनीचे मालक आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. सोमय्या यांनी असेही म्हटले होते की, हसन मुश्रीफ यांनी ग्रामविकास मंत्री असताना 1500 कोटींचे कंत्राट जावयाच्या बनावट कंपनीला दिले. मी पुरावे दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मुश्रीफांना हे कंत्राट रद्द करण्यास सांगितले. मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून 158 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केला. 


इतर महत्वाच्या बातम्या