Old Pension : जुनी पेन्शन लागू करण्यासाठी कोल्हापुरात (Kolhapur News) 4 मार्च रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. याबाबत आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी माहिती दिली. कोल्हापुरात अंजिक्यतारा संपर्क कार्यालयात जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसंदर्भात राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सतेज पाटील यांनी जुन्या पेन्शन योजनेविषयी संघटनांची मते यावेळी जाणून घेतली. शिक्षक, शासकीयसह राजपत्रित अधिकाऱ्यांचे ‘एकच मिशन- जुनी पेन्शन’ हे सरकारला दाखवून देण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात 4 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय सर्व शिक्षक संघटना, राजपत्रित अधिकाऱ्यांच्या संघटनेने घेतला आहे.
जुन्या पेन्शनसाठी लढा उभारण्याची योग्य वेळ
यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले की, देशातील 5 राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. महाराष्ट्रातही ही योजना सुरू करावी यासाठी काँग्रेसने नेहमीच पुढाकार घेतला आहे. इतर राज्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रातही हा निर्णय घेतला पाहिजे. राज्यात जुनी पेन्शन योजनाच 17 लाख कर्मचाऱ्यांचा शाश्वत आधार आहे. 70 वर्षांमध्ये शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या जोरावरच भारताने प्रगती केली आहे. त्यामुळे जुन्या पेन्शनसाठी लढा उभारण्याची आता योग्य वेळ आली आहे. सोमवारी अधिवेशन सुरू होत आहे. यामध्ये जुनी पेन्शन लागू करण्यासाठी लक्षवेधी मांडली जाईल. यासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांची जबाबदारी आपल्यावर राहील.
दरम्यान, या बैठकीमध्ये नवीन योजना कशी फसवी आहे आणि जुन्या योजनेचे फायदे काय आहेत याविषयी संघटनांच्या प्रतिनिधींनी मते मांडली. शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. जयंत आसगावकर म्हणाले की, जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी नागपूर अधिवेशनात लक्षवेधी मांडली होती. यावेळी सरकार दिवाळखोरीत निघेल, असे उत्तर दिले. देशात महाराष्ट्र राज्य उत्पन्नात एक नंबर असून केवळ 4 टक्के रक्कम जूनी पेन्शनवर खर्च होणार आहे. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने शिक्षक व सरकारी कर्मचाऱ्यांची कुचंबना केली आहे.
या बैठकीस समन्वय समितीचे निमंत्रक अनिल लवेकर, कॉम्रेड अतुल दिघे, संस्था चालक संघाचे अध्यक्ष वसंतराव देशमुख, शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी.लाड, शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे प्रा. रघुनाथ ढमकले, शिक्षक नेते दादा लाड, राजाराम वरूटे, दत्ता पाटील, खंडेराव जगदाळे, अनिल घाटगे, सी. एम. गायकवाड, मंगेश धनवडे, सुदेश जाधव यांच्यासह 90 संघटनांचे पदाधिकारी, शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या :