Kolhapur Weather : कोल्हापुरात (Kolhapur News) फेब्रुवारी मध्यापासून गर्मीला सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिना संपण्यापूर्वीच पारा 38 अंशापर्यंत गेल्याने उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. दुपारनंतर तापमानात वाढ होत असल्याने नागरिक चांगलेच हैराण होऊन गेले आहेत. दिवसेंदिवस कोल्हापूरचा पारा आणखी चढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दुपारी बारा वाजल्यापासून ते सायंकाळी चारपर्यंत उन्हाचा तडाखा जाणवत आहे.
दिवसाचे कमाल तापमान हे 37 ते 38 अंश सेल्सिअस राहत असल्याने अंगाची लाही होत आहे. एप्रिल, मे दरम्यान त्यामध्ये आणखी वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा मे महिन्यात जेवढे तापमान असते ते आतापासूनच जाणवू लागले आहे. हवामानातील बदल आणि प्रदूषणामुळे तापमान वाढत असल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्रासह कोल्हापुरातही यंदा तापमान वाढीच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. त्यामुळे ऊस तोडणीवर याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. ऊस तोडणीसह शेतीची कामे पहाटे किंवा दुपारी बाराच्या आतच पूर्ण करावी लागत असल्याचे सध्याचे चित्र आहे. कोल्हापूर जिल्ह्यात फेब्रुवारीमध्ये तापमानाचा पारा पहिल्यांदाच वाढला असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. एप्रिल, मे महिन्यामध्येही उन्हाचा तडाखा आणखी वाढू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या