Satej Patil and Dhananjay Mahadik, कोल्हापूर : काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil)आणि कोल्हापूर (Kolhapur) दक्षिणचे आमदार अमल महाडिक रस्त्याच्या मुद्द्यावरुन (Amal Mahadik) एकत्र आलेले पाहायला मिळाले होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा महाडिक आणि पाटील आमने सामने येणार असल्याची चिन्हं निर्माण झाली आहे. कारण गोकुळ दुध संघात सत्तांतर घडवून आणण्यासाठी भाजप खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी शड्डू ठोकलाय.
धनंजय महाडिक काय काय म्हणाले?
गोकुळमध्ये जास्त हालचाली सुरू आहेत. त्या सकारात्मक आहेत, पण ज्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होतं त्यावेळी माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी सत्तेचा वापर करत आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांना हाताशी धरून गोकुळ दूध संघामध्ये महाविकास आघाडी आणली...सध्या राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे आता गोकुळमध्ये महायुती पॅटर्न यावा, ही आमची इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे.
महायुती म्हणून आम्ही गोकुळच्या अध्यक्षपदावर लक्ष देणार
धनजंय महाडिक म्हणाले, ज्या घडामोडी चालले आहेत त्या सकारात्मक आहेत. त्यामुळे फारसे भाष्य करणे योग्य नाही. गोकुळचे नेते महादेवराव महाडिक यांनी चांगल्या पद्धतीने दूध संघ चालवला होता, नावावर रूपाला आणला होता. मला वाटते की महायुतीचं सरकार राज्यात आहे, त्यामुळे गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष व्हावा अशी माझी इच्छा आहे. यापूर्वी चांगला कारभार करण्याचा प्रयत्न माजी आमदार महादेवराव महाडिक आणि दिवंगत आमदार पी एन पाटील यांनी केला आहे. मात्र आघाडीचे सरकार आल्यावर माजी पालकमंत्र्यांनी शक्कल लढवली. मुख्यमंत्र्यांचा आधार घेऊन त्यांनी गोकुळमध्ये महाविकास आघाडीचे पॅनल उभा केलं, गोकुळमध्ये सत्तांतर केलं, आता तेच उलटलं आहे. त्यामुळे आता महायुती म्हणून आम्ही गोकुळच्या अध्यक्षपदावर लक्ष देणार आहोत. अजून खूप काही अदृश्य शक्ती गोकुळमध्ये आहेत त्या हळूहळू उघड होतील. खूप चांगला निकाल या काही दिवसात समोर येईल.
पुढे बोलताना धनंजय महाडिक म्हणाले, गोकुळ दूध संघ यापूर्वी 25 वर्ष माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या ताब्यात होता हे सर्वश्रूत आहे. गत निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर गोकुळची निवडणूक त्यांनी लढवली आणि त्यावेळेस महाविकास आघाडीचे पॅनल त्या ठिकाणी आलं. आता कसा कारभार गोकुळमध्ये चालला हे सर्वांना माहिती आहे. यापूर्वी महाडिक, नरके यांनी गोकुळ संघ नावा रूपाला आणून एका विशिष्ट स्तरावर पोहोचवला.
गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा व्हावा यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटी झालेल्या आहेत. गोकुळचे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी स्वतः स्पष्ट केल आहे की, मी राजीनामा देणार नाही. त्यामुळे पुढे काय होते ते पाहूया. गोकुळ चेअरमन अरुण डोंगळे यांनी गोकुळच्या नेत्यांचा विश्वासघात केला. यावर मात्र धनंजय महाडिक यांनी नो कॉमेंट्स म्हणत भाष्य टाळलं. येणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती म्हणून सर्वांनी पुढे गेलं पाहिजे.. महायुतीचा झेंडा सगळीकडे लागला पाहिजे, अशी अपेक्षाही महाडिक यांनी व्यक्त केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या