Sanjay Raut In Kolhapur : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut In Kolhapur) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी कोल्हापुरात पोहोचताच भाजप, शिंदे गटावर हल्लाबोल केला. गद्दार गेल्यानंतर संघटन मजबूत होत असल्याचे संजय राऊत म्हणाले. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा आज (ता.1) कोल्हापुरात मेळावा होत आहे. आज सायंकाळी पाच वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात होणाऱ्या या मेळाव्याला खासदार संजय राऊत मार्गदर्शन करतील.
दरम्यान, कोल्हापुरात पोहोचल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "कसबा, चिंचवडच्या पोटनिवडणुकीत यंत्रणांचा गैरवापर झाला आहे. कायदा आणि पोलीस कोणाच्या मर्जीने नाचत आहेत? अशी विचारणा त्यांनी केली. 2024 ला सगळ्यांचा हिशेब देऊ, असा इशारा त्यांनी दिला. जनतेला गर्जनेला बळ देण्यासाठी आम्ही फिरत असल्याचे ते म्हणाले. आम्हाला बाळासाहेबांनी पदे दिली आहेत, त्यामुळे त्यांनी पदावरुन काढलं, तरी आम्ही अशी पदे ओवाळून टाकतो. डुप्लिकेट शिवसेनेचं हे विधीमंडळ नसून चोरमंडळ असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.
गायींच्या मृत्यूवरुन हल्लाबोल
संजय राऊत यांनी कणेरी मठात झालेल्या गायींच्या मृत्यूवरुन हल्लाबोल केला. अशा पद्धतीने गायींच्या मृत्यू अन्य राज्यात निघाला असता, तर हिंदू आक्रोश मोर्चा निघाला असता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी गायींचा मृत्यू होतो. रेडाबळीप्रमाणे हा बळी आहे का? या प्रकरणाची चौकशी करावी, पण हे हत्याकांड असल्याचा आरोप त्यांनी केला. गायींच्या मृत्यूबाबत अजूनही स्पष्टता येत नसल्याने त्यांना विचारण्यात आले असता त्यांनी हे दबावाचं राजकारण सुरु असल्याचा आरोप केला.
कोल्हापुरात शिवगर्जना मेळावा
दरम्यान, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यानंतर कोल्हापुरात होणाऱ्या या पहिल्याच मेळाव्याला ‘शिवगर्जना’ असे नाव दिले आहे. या मेळाव्यात आगामी निवडणुकीचे रणशिंग ठाकरे गटाकडून फुंकले जाणार आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर या मेळाव्याच्या निमित्ताने राऊत पहिल्यांदाच कोल्हापुरात येत आहेत. त्यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून जिल्ह्यातील दोन्ही खासदारांसह शिंदे गटात केलेल्या आजी-माजी आमदारांना लक्ष्य केले जाणार आहे.
या मेळाव्याला शिवसेना उपनेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, प्रवक्ते लक्ष्मण हाके, आमदार बाबूराव माने, युवतीसेना सुप्रदा फातर्पकर, युवासेना विक्रांत जाधव, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर आदी उपस्थित रहाणार आहेत. या मेळाव्याला ठाकरे गटाच्या शिवसैनिकांसह पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केले.
इतर महत्वाच्या बातम्या