Sanjay Mandlik on Shahu Maharaj : आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत, असे विधान खासदार संजय मंडलिक यांनी केलं आहे. ते सुद्धा दत्तक आले आहेत, त्यामुळे तुम्ही आम्ही आणि ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार असल्याचे संजय मंडलिक म्हणाले. माझे वडील सदाशिवराव मंडलिक साहेबांनी खऱ्या अर्थानं पुरोगामी विचार जपल्याचे संजय मंडलिक म्हणाले. मल्लाला हात लावायचा नाही, मल्लाला टांगच मारायचा नाही, मग ती कुस्ती कशी होणार? असाही सवाल संजय मंडलिक यांनी केला आहे. चंदगड तालुक्यातील नेसरी येथे झालेल्या सभेत खासदार संजय मंडलिकांनी अशा वक्तव्यांची मालिका केली.
कोल्हापुरात शाहू महाराज रिंगणात
कोल्हापूर लोकसभेला करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शाहू महाराज यांनी कोल्हापूरची उमेदवारी घ्यावी यासाठी महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांकडून साद घालण्यात आली होती. आजवरची घराण्याची परंपरा आणि पुरोगामी वसा लक्षात घेत शाहू महाराजांनी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर भाजपकडून संजय मंडलिकांचा पत्ता कट करून कागलमधील समरजितसिंह घाटगे यांच्यासाठी चाचपणी केली होती. मात्र, शिंदेंनी आपल्या खासदारांसाठी प्रतिष्ठा लावल्याने संजय मंडलिक यांची उमेदवारी कशीबशी वाचली गेली. हातकणंगलेतून धैर्यशील माने यांच्या उमेदवारी सुद्धा भाजपकडून कडाडून विरोध करण्यात आला होता. मात्र, आता त्याठिकाणी चौरंगी लढत होत असल्याने विरोध मावळला गेला आहे.
संजय मंडलिकांसाठी गोकुळमध्ये फोनाफोनी
दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी देव आला तरी मंडलिक यांचा पराभव होऊ शकत नाही, असा दावा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता. यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापुरातील दोन्ही जागांवरील संकट पाहून स्वत: लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. शिंदे यांनी गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांना फोन करत संजय मंडलिक यांना ताकद लावण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि डोंगळे यांच्या संवादाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या