कोयनेतील विसर्ग वाढविल्याने एकीकडे कृष्णा नदीची पाणी पातळी वाढती आहे तर दुसरीकडे आज सायंकाळच्या सुमारास औदुंबरच्या दत्त मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये कृष्णा नदीचे पाणी गेले आणि उत्सव मूर्ती मंदिरातून देवघरामध्ये हलवली. मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घालून मूर्ती देवघरात हलवली गेली. काल रात्रीच औदुंबरमधील दत्त मंदिर परिसरात पाणी शिरले होते. आज कोयनेतून विसर्ग वाढवल्याने सकाळपासून मंदिर परिसरातील पातळी वाढत होती. सायंकाळच्या सुमारास पाणी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात शिरले. जिल्ह्यात मोठा पाऊस नसला तरी धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने सांगलीतील पाणी पातळी 35 फूटापर्यंत वाढण्याची शक्यता पूरनियंत्रण कक्षाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
गेल्या पाच दिवसापासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. कोयनेमध्ये 83 टक्के तर चांदोली धरणामध्ये 92 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असल्याने धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज सकाळी दहा वाजता कोयना धरणाच्या वक्राकार दरवाजातून 8 हजार आणि पायथा विद्युतगृहातून 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच चांदोलीतून 9 हजार 231, दूधगंगातून 5 हजार 816 , पाटगावमधून 250 , धोममधून 2 हजार 86, उरमोडीमधून 5 हजार 54 आणि तारळी धरणातून 1 हजार 212 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे कृष्णा, वारणा व पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. तर विविध धरणातील विसर्ग लक्षात घेउन संभाव्य पूरहानी टाळण्यासाठी अलमट्टीमधून पाण्याचा विसर्ग सव्वा दोन लाख क्युसेक करण्यात आला आहे. कोयनेतून केल्या जात असलेल्या विसर्गामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी सांगलीतील आयर्विन पूलाजवळ 35 फूटापर्यंत जाण्याची शक्यता पूर नियंत्रण कक्षाच्या प्रभारी कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी सांगितले.
नागठाणे व डिग्रज बंधारे पाण्याखाली गेले असून औदुंबरमधील दत्त मंदिराच्या गाभार्यात नदीचे पाणी शिरले आहे. शुक्रवारी दुपारी सांगलीतील पाणी पातळी 29 फूट 7 इंच झाली होती. या ठिकाणी इशारा पातळी 40 तर धोका पातळी 45 फूट असून 35 फूट पाणी पातळी झाल्यानंतर शहरातील नदीकाठी असलेल्या सुर्यवंशी व इनामदार प्लॉट, कर्नाळ रस्ता, शिवमंदिर परिसर, बायपास चौक, काकानगर, दत्तनगर परिसरातील नागरी वस्तीमध्ये पूराचे पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. उद्या सकाळपर्यंत या भागात पाणी शिरण्याची शक्यता असून नागरिकांनी आज सुरक्षितस्थळी स्थलांतर सुरू केले आहे.
संबंधित बातम्या :
Kolhapur Rain : नृसिंहवाडीतील दत्त मंदिर पुराच्या पाण्याखाली, कृष्णा आणि पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ