कोल्हापूर/नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर (Kolhapur) आणि हातकणंगले (Hatkanangle) मतदारसंघ महाविकास आघाडीत कळीचा मुद्दा झाला असतानाच आता महाविकास आघाडीने संभाजीराजेंच्या (Sambhajiraje Chhatrapati on Loksabha Election) हालचालींवरून सूचक भाष्य केलं आहे. संभाजीराजे महाविकास आघाडीतील पक्षांपैकी लढले तरच पाठिंबा देण्यात येईल, अशी भूमिका घेतली आहे. संभाजीराजे स्वतंत्रपणे त्यांच्या स्वराज्य संघटनेतून लढले, तर मविआ पाठिंबा देणार नाही.
महाविकास आघाडीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीतील तीनपैकी एका पक्षाच्या तिकिटावर संभाजी राजेंनी लढावं, तरच कोल्हापुरात लोकसभेला पाठिंबा देण्याची मविआची भूमिका आहे.
संभाजीराजेंकडून लोकसभा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत!
दुसरीकडे, माजी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी लोकसभेसाठी रणशिंग फुंकले आहे. अलीकडेच त्यांनी 2009 मध्ये झालेली जखम अजूनही विसरलेलो नाही, असे सांगत त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. स्वराज्य संघटना मुख्य प्रवाहात राहणार यामध्ये दुमत असण्याचे कारण नाही. मात्र आम्ही अजून किती जागा लढवणार याबाबत अजून स्पष्टता नाही. आमच्यावर 2009 मध्ये झालेल्या जुन्या जखमा आम्ही अजूनही विसरलो नाही. आमच्यावर कोणीही वार करू शकत नाही. वेळप्रसंगी तुम्हाला सर्वांना दिसेल. स्वराज्यबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे, त्यामुळे संभाजीराजे लढणार की नाही लढणार हे वेळच ठरवेल. कोल्हापूर, नाशिक की संभाजीनगर हा निर्णय सुद्धा वेळ ठरवेल असे सुद्धा त्यांनी म्हटले होते. चर्चेसाठी सर्वांसाठी दरवाजे खुले असल्याचे ते म्हणाले होते.जे कोणी जास्त प्रेम देतील तिथे संभाजीराजे उभारणार असल्याचे ते म्हणाले होते.
दरम्यान, मागील महिन्यात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना वाढदिनी सतेज पाटील यांनी वाड्यावर जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर संभाजीराजे यांची सुद्धा भेट झाली होती. यावेळी बोलताना पाटील यांनी संभाजीराजे यांचे स्वागत असल्याची भूमिका मांडली होती. ते म्हणाले की, स्वराज्य पक्षाने राज्यात चांगलं वातावरण तयार केलं आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी चांगले प्रयत्न केले आहेत. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर काही चर्चा सुरू आहे का? हे पहावं लागेल. महाविकास आघाडी म्हणून घटक पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. या चर्चेमध्ये राजू शेट्टी आणि संभाजीराजे यांच्यासोबत ही चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले होते. त्याचबरोबर त्यांनी सरप्राईज चेहरा असेल, असेही भाष्य केले होते. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून जर तरचा मुद्दा आल्याने संभाजीराजे उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट आहे.
इतर महत्वाच्या बातम्या