कोल्हापूर : किल्ले विशाळगडवर झालेलं अतिक्रमण काढणं हेच मोठ संकट आहे. 13 जुलै रोजी माझ्यासकट सर्व शिवभक्त विशाळगडावर जाणार  आहेत, आता त्यांना कोणीच थांबवू शकत नाही. आम्हाला पोलिसांची भीती दाखवाल, पण आम्ही घाबरणार नाही अशा शब्दात संभाजी राजे छत्रपती निर्धार व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज संभाजीराजे यांनी भूमिका स्पष्ट करताना 13 जुलै रोजी चलो विशाळगडचा नारा दिला. आता गप्प बसून चालणार नाही, कुठेतरी भूमिका घेतलीच पाहिजे असं त्यांनी म्हटले आहे. 


आता आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या मनातील बघायचं आहे 


दरम्यान, अन्यायाविरोधात उभे राहणे हीच माझी भूमिका असल्याचे संभाजी राजे म्हणाले. अतिक्रमण काढून टाकावे हीच एकच मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजसदरेवरून संभाजी राजे तुमच्या मनातील विशाळगड आहे तोच आमच्या मनातील आहे सांगितले होते. आता आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या मनातील बघायचं असल्याचे संभाजी राजे म्हणाले. त्यामुळे 13 जुलै रोजी दुपारी बारा वाजता चलो विशाळगडचा नारा दिल्याचे ते म्हणाले. 


संभाजी राजे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन पुढे जाता आलं पाहिजे. आज ती वेळ आली आहे. विशाळगडला खूप मोठा इतिहास असून त्यामुळे विशाळगडला मी जाण्याचा निर्णय घेतला. त्या ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे एकूण येतो. दीड वर्षांपूर्वी गडावर गेल्यानंतर सगळी दृश्य पाहिल्यानंतर मला खूप दुःख झाल्याचे ते म्हणाले. 


त्यांनी सांगितले की, मी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो होतो आणि अतिक्रमण झाल्याचे सांगितले होते. अतिक्रमण हटवण्याची मागणी केली होती. दोन्ही बाजूनी अतिक्रमण झाल्याचे संभाजीराजे यांनी सांगितलं. आम्ही धर्माच्या विरोधात नाही. शिवाजी महाराजांच्या किल्ला असताना मद्यपान केलं जातं. कत्तलखाने बंद करावेत, अशी आम्ही मागणी केली होती. या सर्व मागण्यांच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्रीपूर्वी अतिक्रमणे काढली जातील, असे आश्वासन देण्यात आलं आणि काम चालू झालं होतं. मात्र, तातडीने त्याला न्यायालयातून स्थगिती देण्यात आली. त्यामुळे अतिक्रमण काढण्याची मोहीम बंद करण्यात आली.


शिवभक्त राजे तुम्ही भूमिका का घेत नाही अशी प्रश्न विचारू लागले होते. त्यामुळे पुन्हा चळवळ सुरू होत आहे. दोन्ही बाजूने झालेल्या आक्रमण काढावे हीच माझी मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले. दीड वर्षांपूर्वी स्थगिती झाल्यानंतर सरकारने काय केले याचे उत्तर द्यावच लागेल, आता गप्प बसून चालणार नाही. भूमिका घ्यावी लागेल असे त्यांनी स्पष्ट केले


इतर महत्वाच्या बातम्या