Samarjeetsinh Ghatge : हसन मुश्रीफ यांनी कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये इतका विकास केलाच आहे, तर वैयक्तिक पातळीवर एवढी टीकाटिप्पणी कशासाठी? मी त्यांच्या टीकेला वैयक्तिक घेतच नाही. मात्र, महिलांवर बोलताना प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे. सभासदांच्या नावे शेअर्स त्यांनी गोळा केलेच आहेत. ते ईडी प्रकरणात आरोपीच आहेत. अनिल देशमुखांना अटक होऊन सुद्धा पक्ष सोडला नाही, असा थेट हल्लाबोल कागलमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि कागल विधानसभेला हसन मुश्रीफ यांच्यासमोर आव्हान उभं ठाकलेल्या समरजितसिंह घाटगे यांनी केला. कागलची जनता शरद पवारांसोबत राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 


कागलची निवडणूक निष्ठा विरुद्ध निष्ठेचा सौदागर


समरजित घाटगे यांनी आज (28 सप्टेंबर) एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. यावेळी घाटगे यांनी सर्वच प्रश्नांना बिनधास्त उत्तरे दिली. भाजपला सोडचिट्टी देण्याचा निर्णय केव्हा झाला, राष्ट्रवादीशी बोलणी केव्हा सुरू झाली या संदर्भात त्यांना विचारण्यात आले असता समरजित म्हणाले की, जेव्हा कागलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुश्रीफ यांना उमेदवारी जाहीर केली त्यावेळी मला निर्णय घ्यावाच लागणार होता. संजय घाडगे यांच्या बाबत त्यांना विचारण्यात आला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. या विषयावर मला काहीच बोलायचं नसलं ते म्हणाले. कागलची निवडणूक निष्ठा विरुद्ध निष्ठेचा सौदागर अशीच लढत असल्याचे त्यांनी सांगितले. कागलची जनता शरद पवारांच्या मागे उभी राहील असेही ते म्हणाले. 


भाजपमधील माझ्या राजकीय गुरूंना भेटलो


2019 मध्ये निवडणूक अनुभवावर त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की तेव्हा आमच्या आईसाहेबांनी एकच वाक्य वापरले होते की 2019 लढले तरच तुम्हाला 2024 लढता येईल. 2019 मध्ये मला खूपच कमी कालावधी मिळाला. त्यामुळे थोडीशी गडबड झाली होती. माझं चिन्ह सुद्धा मतदारसंघांमध्ये पोहोचलं नव्हतं. मात्र, यावेळी परिवर्तनाला साथ मिळेल. कागलची जनता परिवर्तनाला नक्की साथ देईल आणि व्हिजन आणि विकासासाठी कागलला विचार करावाच लागेल असे त्यांनी सांगितले.  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याविषयी ते म्हणाले की जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये माझी पक्षप्रवेशाच्या अनुषंगाने चर्चा सुरू झाली होती. हा निर्णय घेण्यापूर्वी मी भाजपमधील माझ्या राजकीय गुरूंना भेटलो होतो आणि त्यांना भेटल्यानंतर मतदारसंघातील सर्व पार्श्वभूमी सांगितली होती. यावेळी मला विधानपरिषदेचा पर्याय देण्यात आला. मात्र, स्वर्गीय राजेचं स्वप्न पूर्ण करणं हे प्राधान्य आहे. मी जर थांबलो असतो तर परिवर्तन शक्य नसल्याचे ते म्हणाले. 


देवेंद्र फडणवीस हे माझ्यासाठी मोठे भाऊ असल्याचे ते म्हणाले. मी ज्यावेळी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा नितीन गडकरी यांना सुद्धा भेटलो होतो. त्यांनी सुद्धा मला भाजप सोडून न जाण्याविषयी विनंती केली होती. मात्र मी त्यांना एकच गोष्ट बोललो की मी तुमचा मुलगा असतो तर त्यांनी तुम्ही मला हाच सल्ला दिला असता का? त्या प्रश्नावर ते अनुत्तरित झाले. त्यामुळे मला त्यांचा राजकीय आशीर्वाद जरा नसला, तरी त्यांचा आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी राहील असंही ते म्हणाले. 


कागल मतदारसंघासाठी काय आहे व्हिजन? 


दरम्यान, मतदारसंघांमध्ये निवडून आल्यानंतर आपलं व्हिजन काय असेल? या संदर्भाने त्यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की, कागलच नव्हे तर मतदारसंघातील सर्व शाळांचे डिजिटायझेशन करणे हे माझं स्वप्न असल्याचं ते म्हणाले. त्याचबरोबर शाळांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून शाळा बांधणी, टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देणे, आरो वॉटर उपलब्ध करून देणे हा प्राधान्यक्रम असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर उच्च शिक्षणासाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करणे हा सुद्धा मुद्दा असल्याचे त्यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या