Samarjeetsinh Ghatge on Hasan Mushrif : निष्ठा विकून आल्याने त्यांना रात्रीची झोप लागत नाही, झोप लागत नसल्यामुळे चुकीचे शब्द वारंवार बोलतात, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांनी केलेल्या टीकेल्या प्रत्युत्तर दिलं आहे. मुश्रीफ यांनी पातळी सोडून टीका केल्यानंतर समरजित यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार पलटवार केला. कागल नाव बदनाम करण्यासाठी त्यांनी ठेका घेतल्याचेही समरजित म्हणाले. ते म्हणाले की, कागलची निवडणूक ही मुश्रीफ विरुद्ध कागलची सर्वसामान्य जनता आहे हे त्यांना कळालं असून साडेतीन लाख मतदारविरुद्ध मुश्रीफ अशीच निवडणूक होत असल्याने त्यांच्या तोंडून चुकीचे शब्द असल्याचे येत असल्याचे ते म्हणाले. समोरच्या व्यक्तीकडून चुकीचे शब्द यावेत यासाठीच ते वक्तव्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. 


कागलमधील सर्व मतदारांची माफी मागावी 


दरम्यान ईडीच्या आरोपांवर सुद्धा समरजित घाटगे यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की मी केलेले आरोप बरोबर आहेत की चुकीचे आहेत हे तुम्ही सिद्ध केलं आहे. केलेल्या आरोपानंतर तुम्हीच तिकडे पळून गेला आहात, असा टोला सुद्धा समरजीत यांनी लगावला. चाळीस कोटी रुपये खाल्ले याचा हिशोब द्यायला हवा होता असं सुद्धा समरजित म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की खालच्या पातळीवर भाषा वापरून साहेब राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अपमान करत आहेत. गडहिंग्लजच्या इतिहासामध्ये सगळ्यात खालच्या पातळीचे भाषण साहेबांनी केलं आहे. त्यामुळे कागल विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांचा मुश्रीफ साहेब अपमान करत आहेत. त्यामुळे कागलमधील सर्व मतदारांची माफी मागावी असे ते म्हणाले. 


त्यांच्याच कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दांडी मारली


मुश्रीफांनी पडदा लावून काम केलं आहे. त्यांच्याकडे कधीच पुरोगामी विचार नव्हते. शरद पवार साहेबांमुळेच सर्वकाही होतं.  पुरोगामी चळवळीतील लोक साथ देत होते ते आता सोडत आहेत हे त्यांच्या लक्षात आलं आहे, असेही ते म्हणाले. निष्ठा विकून गेल्यामुळेच लोक त्यांची साथ सोडत आहेत, त्यामुळे त्यांना स्टंटबाजी करावी लागत आहे असेही ते म्हणाले. दरम्यान, फडणवीस यांच्या आरोपावरून ते म्हणाले की त्यांच्याच कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दांडी मारली. त्यामुळे कोल्हापूरला आल्यानंतर त्यांनाच विचाराा. मुश्रीफ यांनी समरजित यांच्यावर दलालीचा आरोप केला होता. ते म्हणाले की, ते कागल आणि कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करतात, पण त्यांच्याकडून अपशब्द वापरले जातात. त्यामुळे कोल्हापूर आणि कागलचे नाव बदनाम करण्याचं काम पालकमंत्री करत आहेत तुम्ही विकास केला म्हणता, मग असे वक्तव्य करण्याची आवश्यकता का भासली? असा टोला सुद्धा त्यांनी लगावला.