कोल्हापूर : तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेल्या समरजितसिंह घाटगे यांनी राजकीय भेटीगाठीचा सिलसिला सुरुच ठेवला आहे. समरजित घाटगे यांनी आज (6 सप्टेंबर) दानोळीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांची भेट घेत चर्चा केली. कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. जिल्ह्यासह राज्यात अनेक राजकीय उलथापालथी होत आहेत. या पार्श्वभुमीवर चार दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या समरजित घाटगे यांनी राजू शेट्टी यांची भेट घेतली. राजू शेट्टी सुध्दा शिरोळ विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मतदारसंघात दौरा करत असताना दानोळीत समरजित घाटगे यांनी भेट घेतली. जवळपास अर्धा तास त्यांची बंद खोलीत चर्चा झाली. 






स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कागल विधानसभा मतदारसंघात चांगली ताकद आहे. कागल तालुक्यासह गडहिंग्लज व उत्तूर जिल्हा परिषद गटामध्येही चांगली मते आहेत. यामुळे समरजित घाटगे यांनी राजू शेट्टी यांच्या भेटीला पोहोचले आहेत. 


राजू शेट्टी महाविकास आघाडीचा मार्ग स्वीकारणार?


माजी खासदार राजू शेट्टी आणि समरजित घाटगे यांचे वडील कै. विक्रमसिंह घाटगे यांचे चांगले ऋणानूबंध होते. यामुळे त्यांच्या मैत्रीचा  धागा पकडत समरजित घाटगे यांनी राजू शेट्टी यांची भेट घेतली. राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीत घेतल्यास त्याचा चांगला फायदा होणार असल्याने कदाचित समरजित घाटगे यांच्या पुढाकाराने पुढील रणनीती आखली जाऊ शकते. 


समरजित घाटगे यांनी जिल्ह्यातील महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या भेटीगाठी सुद्धा केल्या आहेत. आमदार सतेज पाटील यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांचीही त्यांनी भेट घेतली आहे. त्यामुळे कागलचे मैदान मारण्यासाठी सर्व पर्यांयाचा अवलंब करण्याकडे समरजित यांचा प्रयत्न दिसून येत आहे. 






इतर महत्वाच्या बातम्या