Sakhar Karkhana Election : कोरोना महामारीमुळे बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेल्या कोल्हापूर (Kolhapur News) विभागातील साखर कारखान्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सन 2021 मध्ये 1 एप्रिल ते 31 डिसेंबर आणि 2022 मधील 1 जानेवारी ते 31 डिसेंबरपर्यंत संचालक मंडळांची मुदत संपलेल्या सर्व साखर कारखान्यांची निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. एक मार्चपासून याबाबत यंत्रणा कार्यरत झाली आहे.


कोल्हापूर विभागातील एकूण 14 सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उत्पादक सभासद आणि संस्था मतदारांच्या प्रारूप याद्या सादर करण्याचे आदेश प्रादेशिक साखर सहसंचालक ए. व्ही. गाडे यांनी संबंधित साखर कारखान्यांना दिले आहेत. निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील 7 आणि सांगली जिल्ह्यातील 7 साखर कारखान्यांचा समावेश आहे. कोल्हापुरातील भोगावती, बिद्री, हमिदवाडा या प्रमुख साखर कारखान्यांचा समावेश आहे.


कोणत्या साखर कारखान्यांचा समावेश?


कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्री, इंदिरा, गवसे, भोगावती, सोनवडे, सदाशिवराव मंडलिक- हमिदवाडा आणि दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखाना यांचा समावेश आहे. दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील (Sangli News) शेतकरी सहकारी साखर कारखाना -कोकळे, क्रांतिअग्रणी- कुंडल, वसंतदादा , नागनाथ अण्णा नायकवडी, सर्वोदय-कारंदवाडी, राजे विजयसिंह -जत आणि यशवंत सहकारी साखर कारखाना-नागेवाडी यांचा समावेश आहे.


या सर्व साखर कारखान्यांना एक फेब्रुवारी 2023 या अर्हता तारखेवर प्रारूप मतदार याद्या तयार करून पाठवाव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत. ''अ'' वर्ग उत्पादक सभासदांसाठी एक फेब्रुवारी 2023 ही अंतिम तारीख निश्चित करून 31 जानेवारी 2021 रोजी आणि त्यापूर्वीचे सभासद ग्राह्य धरून समावेश करावा आणि त्यानुसार प्रारूप यादी तयार करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी. शिवाय ''ब'' वर्ग संस्था सभासदासाठी 31 जानेवारी 2020 ही तारीख निश्चित करून त्या दिवशीचे किंवा त्यापूर्वीचे संस्था सभासद निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.


गळीत हंगाम 20 मार्चपर्यंत संपणार


दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यातील 8 आणि सांगली जिल्ह्यातील 2 कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम संपला आहे. 20 मार्चपर्यंत दोन्ही जिल्ह्यातील गळीत हंगामाची धुराडी थंड होणार आहे. सांगली जिल्ह्यातील सोनहिरा 5 एप्रिल व हुतात्मा कारखाना 15 एप्रिलपर्यंत गळीत हंगाम पूर्ण करतील, अशी माहिती राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे. साखर आयुक्तांनी कोल्हापूर विभागातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील गाळप हंगामाचा आढावा घेतला. मार्केट यार्ड येथील सभागृहात दोन्ही जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालकांची बैठक झाली. 


महत्वाच्या इतर बातम्या :