कोल्हापूर : देशामध्ये सर्वात कठीण समजल्या चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेचा निकाल जाहीर झाला.या परीक्षेत कोल्हापूर विभागातून 40 विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं आहे. कोल्हापूर विभागातून 340 विद्यार्थी यामध्ये परीक्षेसाठी बसले होते. यामध्ये सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलांनी यशाला गवसणी घातली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील गिरगावमधील रमेश पाटील या ट्रॅक्टर चालक शेतकऱ्याच्या मुलानं चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षेला गवसणी घालत यश खेचून आणलं आहे. रोहित पाटील असं त्याचं नाव आहे. रोहितच्या यशानं आई बापाच्या कष्टाचा पांग फिटला आहे. घरची शेतीच्या कामात मदत करत हे यश मिळवलं आहे. त्यामुळे मुलाच्या यशाने आईच्या डोळ्यात आनंदाश्रु आले.


सीए होत आई-वडिलांच्या कष्टाचा पांग फेडला


रोहितला तिसऱ्या प्रयत्नात सीए परीक्षेत यश मिळालं. गिरगाव गावाला सैनिकी परंपरा लाभली असताना वेगळं ध्येय उराशी बाळगताना रोहितने सीए परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलं. त्यामुळे सीए होत आई-वडिलांच्या कष्टाचा पांग फेडला. रमेश पाटील गिरगावमध्ये ट्रॅक्टर चालक अल्पभूधारक शेतकरी आहेत, तर त्यांच्या पत्नी सुद्धा शेतीमध्ये त्यांना मदत करत असतात. रोहितने प्रतिकूल परिस्थितीमध्ये यश मिळवताना परीक्षा उत्तीर्ण केली. यामध्ये रोहितला आई वडिलांसह सीए अमित गावडे यांचं सुद्धा सहकार्य लाभलं. 


पहिल्यापासून सीए होण्याचे ध्येय 


रोहितने दहावीपर्यंत शिक्षण गावामध्ये पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण कोल्हापुरात कॉमर्स कॉलेजमधून पूर्ण केलं. त्याने सुरुवातीपासूनच सीए होण्याचे ध्येय उराशी बाळगताना त्या दिशेने मेहनतीने वाटचाल केली. पहिल्यांदा बारावीमध्ये एट्रान्स दिल्यानंतर बी. कॉम आणि त्यानंतर एम. काॅम पूर्ण करून त्याने आपल्या परीक्षेसाठी प्रयत्न सुरू केले आणि यश मिळवलं. आतापर्यंत ध्येय ठरवून वाटचाल केल्याने यश लाभल्याचे त्याने सांगितले. त्याला या प्रवासात अमित गावडे यांचं सुद्धा मोलाचे मार्गदर्शन लाभले.


आईच्या डोळ्यात अश्रू


आपल्या मुलाच्या यशावर आनंद व्यक्त करताना आईच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. मुलानं जे ठरवलं ते साध्य केल्याचं त्यांनी सांगितले. वडिल रमेश पाटील यांनी पोरगं शिकतंय तर शिकू दे म्हणून त्याला शिकवल्याचे म्हणाले. आपल्या मुलाने कष्टाचं चीज केल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यामुळे एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आता सीए म्हणून नाव कमावणार आहे. कोणतेही ध्येय निश्चित केल्यानंतर त्या दिशेनं सातत्य ठेवल्यास यश मिळते, असे रोहितने आपल्या यशावर बोलताना सांगितले.


इतर महत्वाच्या बातम्या