Kolhapur Crime: अवघ्या तीन महिन्यांपूर्वी पत्नीचा हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर नैराश्यात असलेल्या पतीने गळफास घेत जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur News) घडली. संदीप भगवान बेलवळे (वय 39, रा. बेलवळे खूर्द, सध्या रा. मोहिते मळा, देवकर पाणंद, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. आईच्या आकस्मिक मृत्यूने आणि वडिलांनी घेतलेल्या टोकाच्या निर्णयाने त्यांचा  एकुलता एक मुलगा पोरका झाला आहे. पत्नीच्या निधनानंतर निराशेच्या गर्तेत गेलेल्या संदीप यांना मानसिक आधार देण्यासाठी त्यांच्या मातोश्री त्यांच्यासोबत कोल्हापूर शहरात राहत होत्या. त्या सातत्याने समजून सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, तरीही त्यांनी टोकाचा निर्णय घेतला. 


17 वर्षांच्या संसाराचा धक्कादायक शेवट 


संदीप आणि त्यांची पत्नी अनुराधा यांचा 2006 मध्ये विवाह झाला होता. शेती तसेच व्यवसाय त्यांचे कुटूंब स्थिरस्थावर झाले होते. त्यांना एकुलता एक 14 वर्षांचा मुलगा आहे. सर्व काही आनंदात सुरु असतानाच एप्रिल 2023 मध्ये संदीप यांच्या पत्नी अनुराधा यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर संदीप यांनी पत्नीच्या विरहाने नैराश्याने ग्रासले होते. 


आठवडाभरापासून बेपत्ता अन् टोकाचा निर्णय 


पत्नीच्या विरहाने नैराश्यात गेलेल्या संदीप 25 जुलैपासून बेपत्ता झाले होते. यानंतर त्यांचा गिरगाव हद्दीत (ता. करवीर) गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या स्थितीत मृतदेह आढळून आला. त्यामुळे अवघ्या तीन महिन्यात कुटुंबाला दुसरा मानसिक धक्का बसला आहे. संदीप यांच्या पश्चात मुलगा, आई, भाऊ असा परिवार आहे. भाजप कागल तालुका सरचिटणीस  सागर कांबळे यांचे ते बंधू होत. 


फसवणूक झालेल्या दाम्पत्याची आत्महत्या, सात महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह


दरम्यान, भुदरगड तालुक्यातील व्हनगुत्तीमधील तरुण दाम्पत्याने फसवणूक झाल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. दोन व्यक्तींकडून त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याने या दाम्पत्याने टोकाचा निर्णय घेतल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.  राहुल राजाराम परीट (वय 23) व त्यांची पत्नी अनुष्का (वय 21) अशी त्यांची नावे आहेत. इस्पूर्ली (ता. करवीर) येथे गुरुवारी ही घटना उघडकीस आली. या घटनेची नोंद इस्पूर्ली पोलिसांमध्ये झाली आहे. इस्पुर्लीत एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. 


राहुलचा सात-आठ महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपली फसवणूक झाल्याची चिठ्ठी कुटुंबीय व इतरांना पाठविली होती. राहुलने सोशल मीडिया स्टेटसवर वडिलांपेक्षा महत्त्वाचं कोणी नाही आणि आईपेक्षा मोठ कोणी नाही. ‘लव्ह यू सो मच मम्मी अँड पप्पा. आय एम सो सॉरी’ असा मेसेज टाकून आई-वडिलांची माफी मागितली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या