Agnipath Scheme : कोल्हापूरमध्ये अग्निपथ योजनेतंर्गत शिवाजी विद्यापीठ परिसरात क्रीडा मैदानावर 22 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर 2022 या कालावधीत भरती मेळावा होणार आहे. कोल्हापुरातील भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया 5 ऑगस्ट 2022 रोजी सुरु झाली आहे. नोंदणीसाठी 03 सप्टेंबर 2022 पर्यंतची अंतिम मुदत आहे.
या मेळाव्यामध्ये अग्निवीर सामान्य सेवा (सर्व शाखा), अग्निवीर तांत्रिक कर्मचारी, अग्निवीर लिपिक/ भांडार व्यवस्थापक तांत्रिक विभाग/ वस्तुसूची व्यवस्थापन (सर्व शाखा), अग्निवीर कुशल कारागीर (दहावी उत्तीर्ण) (सर्व शाखा), अग्निवीर कुशल कारागीर (सर्व शाखा) (आठवी उत्तीर्ण) (हाऊसकीपर आणि मेस कीपर) या श्रेणीतील पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येईल.
कोल्हापूरसह सातारा, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतील तसेच गोवा राज्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या भागातील कायम रहिवासी असलेल्या उमेदवारांना या मेळाव्यात सहभागी होता येईल.
इच्छुक उमेदवारांनी भारतीय लष्कराच्या www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर नोंदणी करून ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन पद्धतीने यशस्वीपणे नोंदणी करणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या इमेल आयडीवर प्रवेश पत्र पाठविण्यात येईल. या मेळाव्यासाठी नोंदणी करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराचे संपूर्ण कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झालेले असणे अनिवार्य आहे. या उमेदवारांचे बायोमेट्रिक पद्धतीने व्हेरिफाय करून प्रत्यक्ष निवड चाचण्या होण्यापूर्वी त्यांना मेळाव्यासाठी दिलेले प्रवेशपत्र तपासण्यात येईल.
भरतीसाठी पुढील तीन टप्प्यांमध्ये चाचण्या होतील. शारीरिक क्षमता चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि सामायिक प्रवेश परीक्षा (लेखी परीक्षा). शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना 15 जानेवारी 2023 रोजी होणारी सामायिक लेखी परीक्षा (सीईई)द्यावी लागेल. अंतिम गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांना देशसेवेसाठी अग्निवीर म्हणून भारतीय लष्करात भर्ती होण्याबाबतचे पत्र देण्यात येईल.
मेळाव्याच्या ठिकाणी येताना उमेदवारांनी मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे, पुरेशा प्रमाणात छायाचित्रे, प्रारुपात नमूद केल्यानुसार वैध प्रतिज्ञापत्र, रहिवासाचे प्रमाणपत्र तसेच जात प्रमाणपत्र यांसारखी सर्व कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होत असून इच्छुक उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या मध्यस्थीच्या अमिषाला बळी पडू नये असे आवाहन लष्कराच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. कोणत्याही प्रकारच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर चौकशी करावी अथवा 0231-2605491 या क्रमांकावर थेट संपर्क साधावा.
इतर महत्वाच्या बातम्या