Rajesh Kshirsagar : एकनाथ शिंदे बंडाळी करून शिवसेनेत उभी फूट पाडल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातही त्याचे पडसाद जाणवले. कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर तसेच कोल्हापूरचे दोन्ही खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने शिंदे कळपात सामील झाले आहेत. 


त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असतानाच युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला कोल्हापूरमध्ये मिळालेल्या प्रतिसादानंतर बंडखोरांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, बंडखोर माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून एकनाथ शिंदे गटासाठी आज सदस्य नोंदणी करण्यात आली. 


त्यांनी एकदिवसाच्या सदस्य नोंदणीमध्ये एकनाथ शिंदे गटासाठी 11 हजार सदस्य नोंदणी झाल्याचे सांगितले. इतक्या मोठ्या प्रमाणावर सदस्य होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा दावा त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, शिवसेना पक्षात क्रांती झाली. मोठ्या प्रमाणात क्रांती झाली आणि या क्रांतीचे समर्थन करण्यासाठी 9 ऑगस्ट क्रांती दिनी रॅली आयोजित करण्यात आली आहे. खऱ्या अर्थाने शिवसेनेबरोबर नेहमी गद्दारी करणारे स्वतः निष्ठावंत समजतात, असेही ते यावेळी म्हणाले. 


राजेश क्षीरसागर यांनी ठाकरे कुटुंबावर थेटपणे बोलणे टाळले. मात्र ते म्हणाले की, समस्त महाराष्ट्रातील जनता मतदार उघड्या डोळ्याने पाहत आहे, एकनाथ शिंदे साहेबांचा संपूर्ण राज्यामध्ये दौरा सुरू आहे. आम्ही मुख्य नेते म्हणून त्यांची आम्ही राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये निवड केली आहे. शिवसेनाप्रमुखांनंतर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद जाणवत आहे. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिक स्वागत करत आहेत, फुले उधळत आहेत. त्यांच्या सभेला लाखोंच्या संख्येने सहभागी होत आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या