Ravindra Chavan: “आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे,” असे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ आणि कुरुंदवाड येथे महायुती आणि ताराराणी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले की, केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणात्मक कामामुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती मिळाली आहे. “राज्याचा प्रमुख प्रामाणिकपणे आणि जोरदार धोरणात्मक काम करत असेल, तर शहरांचा विकास वेगाने होतो. इथला विकास करायचा असेल, तर त्यासाठी मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेऊ शकतात,” असे सांगत त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले.
पण आज महाराष्ट्रात लोडशेडिंग नाही
केंद्र सरकारच्या योजनांचा उल्लेख करताना त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिवर्षी 6 हजार रुपये जमा करणाऱ्या पीएम-किसान योजना, आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड, तसेच कोरोना काळात उपलब्ध करून दिलेली लसीचा उल्लेख केला. “कोरोना काळात लस करून मोफत उपलब्ध करून दिली त्यामुळे आज आपण सर्वजण जिवंत आहोत” असे ते म्हणाले. त्यांनी काँग्रेस–राष्ट्रवादीच्या काळातील लोडशेडिंगची आठवण करून दिली. “त्या काळात दिवसाला सहा तास लोडशेडिंग व्हायचं. पण आज महाराष्ट्रात लोडशेडिंग नाही. हे बदल ओळखले पाहिजेत,” असे चव्हाण म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद असणार
त्यांनी पंतप्रधानांच्या अन्न सुरक्षा योजनाचाही उल्लेख केला. “कुणीही उपाशी राहू नये, म्हणून अन्न सुरक्षा योजना लागू करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले,” असे सांगत त्यांनी जनतेने केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ लक्षात ठेवावा, असे आवाहन केले. “जरी निवडणूक नगर परिषदेची असली, तरी इथली सत्ता प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांच्या हातात दिली पाहिजे. या परिषदांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद असणार आहे,” असे आश्वासन त्यांनी दिले.
इतर महत्वाच्या बातम्या