Raju Shetti : अतिशय दुर्गम भागात विखुरलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यात (Shahuwadi Taluka) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) वाड्या वस्त्यांवर पिंजून काढत आहेत. होळीच्या निमित्ताने राजू शेट्टी संपर्क दौरा करत 21 मार्चला होत असलेल्या मोर्चाबद्दल भूमिका स्वत: सांगत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर 21 मार्च रोजी सकाळी 11वाजता विठ्ठल मंदिर मलकापूर ते तहसिल कार्यालय शाहूवाडी मोर्चाचे स्वाभिमानीकडून आयोजन करण्यात आले आहे. 


शाहूवाडी तालुक्यात वाड्या वस्त्यांवर दौरा


शाहूवाडी तालुक्यामध्ये वाड्या वस्त्यांवर राजू शेट्टी यांच्याकडून संपर्क दौरा सुरु आहे. गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यातील मानोली, आंबा केर्ले, केर्ले धनगर वाडा, घोळसवडे, धावुरवाडा, वारूळ, वालूर, जावली, करुंगळे, अलतुर, पुसार्ळे, भेंडवडे, निनाई परळे, वाकोली, वाकोली धनगरवाडा, लोळाणे, निळे, वीरवाडी, कडवे, म्हालसवडे, म्हालसवडे धनगरवाडा, सुका माळ धनगरवाडा, ऐनवाडी ,ऐनवाडी धनगरवाडा, खेळता धनगरवाडा ,मुसलमान वाडी, धोपेश्वर धनगरवाडा, पांढरे पाणी, भाततळी, गेळवडे, पारीवणे, मांजरे, शेंबवणे, नवलाईवाडी, गावडी, कुंभवडे, गवळवाडी, अनुस्कुरा, मोसम आदी वाड्यांवर जाऊन लोकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या आहेत. 


यावेळी त्यांनी 2019 च्या निवडणुकीच्या पराभवानंतर चार वर्षांच्या काळातील आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी केलेल्या विविध आंदोलनाचा लेखाजोखा त्यांच्यासमोर सादर केला. येणाऱ्या पुढील काळामध्ये शेतकऱ्यांसाठी त्यांच्या मूलभूत प्रश्नासाठी रस्त्यावरची लढाई चालूच ठेवू अशी ग्वाही शेतकऱ्यांना दिली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरेश म्हाऊटकर, भैया थोरात, अजित साळोखे, प्रशांत मिरजकर, अवधूत जानकर, जयसिंग पाटील, अमोल महाजन, रायसिंग पाटील, संजय केळसकर,विजय पाटील, बाजीराव सुळेकर, राजू केसरे, इ. कार्यकर्ते उपस्थित होते. 


शाहूवाडी तहसिलवर मोर्चा कशासाठी? 


जंगली प्राण्यापासून शेतीचे होणारे नुकसान त्यामध्ये भात, सोयाबीन, भुईमूग, ऊस, मका आदी पिकांचे या गव्यांपासून शेतीचे मोठे नुकसान होत आहे. बिबट्या, तरस जंगली कुत्री यांच्यापासून वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेळ्या मेंढ्या, म्हैशी आदी पाळीव प्राण्यांवरती हल्ले होत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. रेशनची सुविधा नसल्याचे आढळून येत आहे. काही रेशन कार्ड कायमची बंद केली असल्याचे निदर्शनास येत असून ऑनलाईन नावे दिसून येत नाहीत. वीज बिले विना मीटर रिडींग न घेता मोगम दिली जातात. डिपी, फ्युजा जळालेल्या अवस्थेत आढळून येत आहेत. ऐन उन्हाळ्यात शेतीच्या पाण्याची समस्या, कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडीत करणे आदी कारणांसाठी 21 मार्च रोजी सकाळी 11वाजता विठ्ठल मंदिर मलकापूर ते तहसिल कार्यालय शाहूवाडी मोर्चाचे स्वाभिमानीकडून आयोजन करण्यात आले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या