Kolhapur News : अतिताप आल्याने बारावीत शिकत असलेल्या श्रावणी अरुण पाटील, (वय 18, रा. दुसरा बस स्टॉप, फुलेवाडी, कोल्हापूर) या तरुणीचा दुर्दैवी अंत झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. श्रावणीचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. श्रावणीच्या या मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. ती शिवाजी पेठेतील महाविद्यालयात शिकत होती. श्रावणीची सध्या बारावीची परीक्षा सुरू होती. उर्वरित विषयांचा अभ्यास सुरु असतानाच चार दिवसांपूर्वी श्रावणीला ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास सुरू झाला. त्यामुळे उपचारासाठी फुलेवाडीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तिला रविवारी सकाळी घरी सोडण्यात आले.
मात्र, सोमवारी रात्री पुन्हा पुन्हा ताप आला. त्यानंतर सीपीआरमध्ये दाखल करण्यासाठी आणले जात असतानाच ती बेशुद्ध पडली आणि तिचा मृत्यू झाला. भावी आयुष्याची स्वप्ने पाहत असतानाच मुलीचा मृत्यू झाल्याने आईवडिलांनी एकच आक्रोश केला.
बारावीतील विद्यार्थीनीची आत्महत्या
दुसरीकडे, कोल्हापूरह जिल्ह्यात सलग आत्महत्यांचे सत्र सुरुच आहे. अवघ्या आठवडाभरापूर्वी कोल्हापूर शहराला लागून असलेल्या मोरेवाडीत बारावीच्या विद्यार्थीनीने आत्महत्या केली होती. मोरेवाडी परिसरातील कोरेनगरमधील लीया अमित रुकडीकर (वय 18) हिने आज घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या मागे आई, वडील, बहीण व आजी असा परिवार आहे. ती बारावीची परीक्षा देत होती. करवीर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडिलांनी फोन केल्यानंतर लीयाने तब्येत बरं वाटत नसल्याचे सांगितले. आई वृषाली शिक्षिका असल्याने शाळेत गेल्या होत्या. तिच्यासोबत घरी फक्त आजी होती. झोपायला जाते म्हणून सांगून लीया बेडरूममध्ये गेली होती. दुपारी दीडच्या सुमारास वडील घरी आल्यानंतर औषधे घेण्यासाठी तिला बोलविले. मात्र, कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने वडिलांनी दरवाजा ढकलून कडी तोडून खोलीत प्रवेश केला असता त्यांना मोठा धक्का बसला.
इतर महत्वाच्या बातम्या