कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) कार्यक्रम जाहीर झाला असला तरी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार कोण असणार याची शाश्वती अजूनही मतदारांना आलेली नाही. त्यामुळे लढत कशी असणार याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही. कोल्हापूर लोकसभेला काँग्रेसकडून शाहू महाराज यांचे नाव आणि हातकणंगलेमधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांचे नाव निश्चित असलं तरी त्यांच्या विरोधातील उमेदवार अजूनही ठरलेला नाही. त्यामुळे ही लढत कशी होणार याबाबत अजूनही चर्चा सुरूच आहे. 


हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आपल्याला सोडावा


दरम्यान, राजू शेट्टी यांनी दुसऱ्यांदा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने हातकणंगले मतदारसंघांमध्ये पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरू झाली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आपल्याला सोडावा, अशी मागणी शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. उद्धव ठाकरे यांनी राजू शेट्टी यांना मशाल चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र,राजू शेट्टी यांनी गेल्या 25 वर्षांपासून मी पक्षाच्या चिन्हावर लढत असल्याचे सांगत मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले. संघटनेच्या माध्यमातून निवडणूक लढवली असून आयुष्यात इतर पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढवली नसल्याचे त्यांनी ठाकरे यांना सांगितले. 


उद्धव ठाकरेंच्या भेटीवर काय म्हणाले?


राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर बोलताना सांगितले की, याठिकाणी (हातकणंगले) तुम्ही लढू नका असे त्यांना सांगितले. हातकणंगलेत पाठिंबा मिळाल्यास राज्यात ज्याठिकाणी शिवसेना लढत आहे, त्याठिकाणी पाठिंबा देण्याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे त्यांना सांगितल्याचे शेट्टी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा केली जाईल. ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे सांगितल्याचे शेट्टी म्हणाले. मला पाठिंबा देण्याबाबत स्थानिक शिवसैनिकांची ईच्छा दिसते. संपर्कात असलेल्या शिवसैनिकांकडून मतविभागणी नको म्हणून मला पाठिंबा देण्यास अनुकूल असल्याचे शेट्टी म्हणाले. 



दरम्यान, राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचे सांगितले. हातकणंगलेची जागा उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला आल्याचे समजल्यानंतर ठाकरे यांची भेट घेतल्याचे शेट्टी म्हणाले. महाविकास आघाडीमधील काही धोरणांवर अजूनही आपल्याला आक्षेप असून त्यांनी अजूनही खुलासा केलेला नाही.  


उद्धव ठाकरे यांना कोणताही आक्षेप नसल्याने चर्चा


दरम्यान राजू शेट्टी यांनी बोलताना आमचा उद्धव ठाकरे यांना कोणताही आक्षेप नसल्याने त्यांच्याशी चर्चा करत असल्याचे स्पष्ट केले. आम्ही महाविकास आघाडीमध्ये गेलेलो नाही. मात्र, राज्यात सहा जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे तो कार्यकर्त्यांना आर्थिक ताकद पाहून निर्णय घ्यायला सांगितल्याचे ते म्हणाले. आम्हाला कोणी निवडणू रोखे देत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्या आर्थिक कुवतीचा अंदाज घेऊन निर्णय घ्यावा, असं सांगितल्याचे ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या