कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गटाकडून मला मशाल चिन्हावर लढण्यासाठी ऑफर देण्यात आली. मात्र, मी शेतकऱ्यांची चळवळ कायम ठेवण्यासाठी मी स्पष्ट नकार दिला. राजकारण करायचं असेल, तर कधीच राष्ट्रीय पक्षासोबत गेलो असतो अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. ते आज कोल्हापुरात बोलत होते. यावेळी बोलताना ठाकरे गटाकडून देण्यात आलेल्या प्रस्तावावर भाष्य केले.  


त्यामुळे मी उद्धव ठाकरे यांना दोनदा भेटायला गेलो


महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना भेटा अशी विनंती केली. त्यामुळेच मी उद्धव ठाकरे यांना दोनदा भेटायला गेलो होतो. शिवसेना सोडणाऱ्यांना धडा शिकवायचा असेल तर मला पाठिंबा द्या असं मी म्हणालो. मात्र, शिवसेनेनं अचानक उमेदवार जाहीर केला. ती जाहीर करण्याच्या आधी काही तास शिवसेना ठाकरे गट माझ्या संपर्कात होता, असाही दावा त्यांनी केला. शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय घेतला त्यावेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार होतं. मात्र, त्यावेळी विरोध न करता आता बोलले जात आहे. शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचं काम हा शक्तीपीठ महामार्ग करणार असल्याचे ते म्हणाले. 


संजय राऊत 'स्वाभिमानी'त येऊन शिवसेनेचे काम करतील का?


राजू शेट्टी म्हणाले की, शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित आबा पाटील यांचे वडील हे एक साखर कारखाना चालवतात. त्यामुळे ही निवडणूक शेतकरी विरुद्ध कारखानदार अशी होईल. काही कारखानदारांना माझा काटा काढण्याची संधी मिळाली, असं वाटतं असेल. शिवसेनेला त्यांच्या विरोधकांचा पराभव करायचं होता आणि मला लोकसभा निवडून यायचं होतं. संजय राऊत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत येऊन शिवसेनेचे काम करतील का? अशीही त्यांनी विलीनीकरणाच्या मुद्यावरून विचारणा केली. 


वंचित उमेदवार भाजपत सक्रिय


शेट्टी यांनी सांगितले की, हातकणंगलेमधील वंचित उमेदवार भाजपचे सक्रिय असल्याचा आरोपही त्यांनी केला. आजही त्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे कुठून काय काय घडलं हे तुम्हाला माहिती झालं असेल. आजही आम्ही सहा जागा लढवण्यावर ठाम  असल्याचे ते म्हणाले. 


उमेदवार द्यायचा आहे की नाही हे चर्चा करून ठरवणार 


दुसरीकडे, कोल्हापूरमध्ये शाहू महाराज यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा आहे की नाही हे चर्चा करून ठरवणार असल्याचे ते म्हणाले. शाहू महाराज यांच्याबद्दल आमच्या भावना वेगळ्या आहेत, कारण शेतकऱ्यांचा प्रश्नावर शाहू महाराज यांनी नेहमी पाठिंबा दिला. महाविकास आघाडीने माझ्या विरोधात उमेदवार दिला, तरी कोल्हापूरबद्दल आम्ही विचार करू असेही त्यांनी स्पष्ट केले.


इचलकरंजी शहराच्या पाण्यासाठी मी कधीही विरोध केला नाही. पिण्याच्या पाण्याचे आणि शेतीच्या पाण्याचे आरक्षण वेगळं असतं. मी पाणी द्यायला पाहिजे हे सांगायला गेलो होतो, त्या फोटोचा विपर्यास केला आणि मला बदनाम केलं. विद्यमान खासदारांनी तर काहीच केलं नाही, इचलकरंजी शहराला लढा देऊन मीच देणार असल्याचे ते म्हणाले. 


गेल्या सहा महिन्यांपासून हातकणंगले जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली असं परस्पर सांगितलं जातं होतं. आम्ही तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीची साथ सोडली आहे. महायुतीची साथ आम्ही आधीच सोडलेली आहे, भाजपच्या विचारधारेला आम्ही उघड विरोध केला आहे. जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम भाजपने केले. भाजपने शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित ठेवले, हमीभाव कायदा आणला नाही, अशी टीका त्यांनी केली. 


दिल्लीत शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केलं पण त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय घेतला त्यावेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार होतं. मात्र, त्यावेळी विरोध न करता आता बोलले जात आहे. शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचं काम हा शक्तीपीठ महामार्ग करणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या