Raju Shetti on Farmer Caste Query : रासायनिक खत खरेदी करताना आता शेतकर्यांना पॉस मशिनवर शेतकऱ्यांना जात सांगावी लागत असल्याने संतापाचा उद्रेक झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (raju Shetti) यांनी संताप व्यक्त करताना शेतकऱ्यांची जातींमध्ये वाटणी करणार आहात का? अशी विचारणा केली आहे. त्यांनी हा निर्णय तातडीने रद्द करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिलं आहे.
राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, भारतीय राज्यघटनेच्या कलम 15 नुसार कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल किंवा अपमान होईल अशा प्रकारे जात, धर्म, वंश, पंथ इत्यादीची विचारणा सरकारने करणं बेकायदेशीर आहे. मुलभूत अधिकारावर अतिक्रमण आहे. भारत सरकारकडून रासायनिक खते खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर शेतकऱ्यांना जात विचारली आहे. असे करून शेतीमध्ये जातीवाद आणणे, धर्मवाद आणणे म्हणजे हे बेकायदेशीर आहे. शेतकरी ही एकच जात आहे. त्यामुळे या गोष्टीला आक्षेप घेणारं पत्र पंतप्रधान, राष्ट्रपतींना पाठवलं आहे. शेतकऱ्यांची चेष्ठा, अपमान थांबवावा, अन्यथा याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही.
शेतकऱ्याला जात विचारु नये
दरम्यान, रासायनिक खत घेणाऱ्या शेतकऱ्यांना जात विचारले समोर आल्यानंतर राज्याच्या कृषी विभागाने खत मागणाऱ्या शेतकऱ्यांना जात विचारु नये, असं विनंती करणारं पत्र राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्याकडून केंद्रीय खते आणि रसायने विभागाच्या सचिवांना तातडीने पाठवण्यात येणार आहे. खते विकत घेण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने तयार केलेल्या ॲपमधे जात विचारली जात असल्याच समोर आल्यानंतर विरोधकांकडून सरकारवर हल्लाबोल केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात भावना लक्षात घेऊन आम्ही केंद्राला कळवणार असल्याचे सांगितले. 6 मार्चपासून या "ई पॉस"मशीन मध्ये अपडेट करण्यात आले आहेत. ज्यामध्ये शेतकऱ्यांना आता पैसे व इतर गोष्टींच्या बरोबर जात लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. जात सांगितल्यानंतर दुकानदाराकडून खत देण्यात असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. विरोधकांनी धारेवर धरल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडली.
विरोधकांकूडन सरकार धारेवर
सांगली जिल्ह्यात जर शेतकऱ्यांना खत घ्यायचे असेल, तर त्यांना पहिलं जात सांगावी लागत आहे. मात्र, शेतकऱ्यांना जात नसते, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. याबाबत शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. शेतकऱ्यांनी जातीचा रकाना भरल्याशिवाय फॉर्म भरला जात नाही. पुरोगामी महाराष्ट्रात असं होण योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
ई-पॉस मशीनमध्ये जातीची विचारणा
गेल्या काही दिवसापासून ई-पॉस मशीन या सॉफ्टवेअर यंत्रणेमध्ये अशा पद्धतीचे अपडेटस् आले आहेत. खत घेताना दुकानदारांकडून जातीची विचारणा होत असल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत. रासायनिक खत खरेदी करताना आता शेतकर्यांना आपली जात सांगावी लागत असल्याने बळीराजांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शेतकर्यांना दुकानांत खत खरेदीसाठी गेल्यानंतर नाव, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड क्रमांक, पोत्यांची संख्या याची माहिती द्यावी लागते. त्यानंतर पॉस मशिनवर शेतकर्यांना अंगठा घेऊन खत दिले जाते.
इतर महत्वाच्या बातम्या