Raju Shetti on Devendra Fadnavis: फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांवर आणि प्रशासनावर घणाघाती हल्ला चढवला आहे.“रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खुलासा करण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लीन चीट दिली, हे अत्यंत आश्चर्यकारक आहे. मुख्यमंत्री बहुतेक कोरी सर्टिफिकेट घेऊन फिरत असावेत, एखादा भाजपचा माणूस दिसला की लगेच क्लीन चीट द्यायची” अशा शब्दात राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यावर प्रहार केला. 

Continues below advertisement

राज्यात कायद्याचं राज्य आहे का? 

राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना थेट प्रश्न करताना विचारले की “राज्यात कायद्याचं राज्य आहे का? पोलीस अधिकारीच जर बलात्कार करत असतील, तर गृहखातं काय करतंय? एका सरकारी डॉक्टरवर पोलीस अधिकारी अत्याचार करतो, मग न्याय कुठे आहे?” ते म्हणाले, “पैसे दिल्यावर पोस्टिंग मिळते, हीच परिस्थिती आहे. अशा अधिकाऱ्यांना मस्ती आली असेल, तर त्याचं अपयश गृहमंत्र्यांचे आहे.”

तर वर्दीचा देखील आम्ही मुलाहिजा ठेवणार नाही 

ते म्हणाले, “वर्दीतील पोलिसवाला बलात्कार करत असेल, तर गृहखातं काय करायला लागलं आहे हे दिसून येतं. पोलिस अधिकारी एका सरकारी कर्मचाऱ्यावर बलात्कार करतो, एका डॉक्टरवर बलात्कार करतो. त्यामुळे कुठे आहे कायदा? याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा”, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. ते म्हणाले की, “ शेतकऱ्यांच्या मुली रस्त्यावर पडलेल्या नाहीत. कोणीही तिच्यावर अत्याचार करावा. हे आम्ही अजिबात सहन करणार नाही. अशा पद्धतीने पोलिस वागायला लागले, तर त्यांच्या अंगावर असणाऱ्या वर्दीचा देखील आम्ही मुलाहिजा ठेवणार नाही, आम्ही त्यांना ठोकून काढू” असा इशारा त्यांनी दिला. 

Continues below advertisement

बच्चू कडूंच्या आंदोलनात सहभागी होणार 

दरम्यान, बच्चू कडू यांच्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. त्यांनी सांगितले की, “मी आज रात्री नागपूरच्या दिशेने निघत आहे. बच्चू कडूंच्या आंदोलनात सहभागी होणार आहे. बच्चू कडू यांनी आंदोलनाची घोषणा करून अनेक दिवस झाले आहेत. आता अचानक मुख्यमंत्र्यांनी बैठकीला बोलवणं म्हणजे योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये बैठक बोलावली असती, तर तिथल्या तिथं त्यांना सहभागी होत आला असतं. एक तर दळणवळणाची साधने नाहीत. शेतकरी नेत्यांकडे मुख्यमंत्र्यांसारखे चार्टर्ड विमान नाहीत, त्यामुळे बैठकीला कसं जाणार?” अशी विचारणा त्यांनी केली. 

इतर महत्वाच्या बातम्या