कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thakeray) यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur News) आणि विशेष करून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातही (Hatkanangale Lok Sabha Constituency) उमटले. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी या भेटीवर जाहीर नाराजी व्यक्त करताना थेट राजू शेट्टी यांच्यावर तोफ डागली. यानंतर मुरलीधर जाधव यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाकडूनही कारवाई करण्यात आली आहे.


मुरलीधर जाधव यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. यामुळे पुन्हा जिल्ह्यात राजकीय भूवया उंचावल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी एबीपी माझाशी बोलताना उद्धव ठाकरे यांची भेट आणि मुरलीधर जाधव यांच्या हकालपट्टीवर भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी किंवा महायुती दोन्ही बरोबर जाणार नसल्याचा पुनरुच्चार केला. 


मुरलीधर जाधव यांनी किमान माझी पत्रकार परिषद पाहायला हवी होती


राजू शेट्टी यांनी सांगितले की, मातोश्रीवर झालेली उद्धव ठाकरेंसोबतची बैठक अराजकीय होती. स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या सहा जागांवर आपलं लक्ष केंद्रित करेल. मुरलीधर जाधव यांनी किमान माझी पत्रकार परिषद पाहायला हवी होती. ते माझे चांगले मित्र आहेत, त्यांची काय नाराजी आहे हे मला माहिती नाही. कदाचित शिवसेना पक्षातील हा अंतर्गत प्रश्न असू शकतो. दोन्ही आघाड्यांमध्ये साखर कारखानदार खचाखच भरले आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीने जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा अपक्ष लढली आणि जिंकली तशीच निवडणूक यावेळी लढली जाईल, असे त्यांनी सांगितले. 


राजू शेट्टींबाबत काय म्हणाले मुरलीधर जाधव? 


मातोश्रीवर राजू शेट्टी यांनी भेट घेतल्यानंतर मुरलीधर जाधव यांनी खोचक शब्दात टीका केली होती राजू शेट्टी हा माणूस असा आहे की दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत.2014 ला महायुतीच्या माध्यमातून याच राजू शेट्टींना सर्व शिवसैनिकांनी स्वतःच्या खिशातले पैसे घालून, स्वतःचं डिझेल घालून निवडून आणलं होतं. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या, भाजप आणि शिवसेनेची युती फिसकटली आणि हेच राजू शेट्टी भाजपच्या गोटात जाऊन बसले. म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी केली.


उद्धव साहेबांना माझी विनंती आहे की, पाच वर्षे शहर प्रमुख, तीन वर्ष तालुकाप्रमुख, 19 वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून काम करतोय. माझ्यासारख्या निष्ठावंतांची या ठिकाणी इच्छा आहे की हातकणंगले लोकसभा मतदारसंघ मी लढवला पाहिजे. 2005 ला पक्ष फुटला त्यावेळीसुद्धा आम्ही पक्षासोबत राहिलो. गेल्या दीड दोन वर्षांपूर्वी सुद्धा आम्ही साहेब तुमच्यासोबत राहिलो. जयसिंगपूर आणि कोल्हापूर या ठिकाणी महामोर्चे काढले, असं जाधव म्हणाले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या