Raju Shetti : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी आज आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. गेल्या तीन दिवसांपासून भूमिगत असलेल्या तुपकरांनी आज बुलढाण्यात अचानक पोलिसांच्या वेशात येत अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेनंतर तुपकर यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. हे आंदोलन सुरु असतानाच कार्यकर्त्यानी दगडफेक केली. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करत रविकांत तुपकरांना ताब्यात घेतले. या सर्व प्रकारानंतर संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) अत्यंत संतप्त झाले असून त्यांनी शिंदे फडणवीस सरकारची तुलना जनरल डायरशी केली. कितीही काठ्य़ा चालवल्या, तरी बळीराजा तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात हल्लाबोल केला आहे.
राजू शेट्टी म्हणाले की, पीक विम्याची रक्कम, सोयाबीन कापसाचा भाव मागणाऱ्या शेतकऱ्यांवर तुम्ही लाठ्या चालवता. पोलिस बळाचा वापर केला जातो. जनरल डायरने जन्माला घातल्यागत पोलिस वागतात, पण राज्य सरकारला इतकंच सांगायच आहे, तुम्ही कितीही लाठ्या काठ्या घाला शेतकरी मागे हटणार नाही. हा बळीराजा एक दिवस तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या रविकांत तुपकरांवर कारण नसताना वेगवेगळे गुन्हे दाखल करून वेठीस धरणार असाल, तर लक्षात ठेवा याची किंमत तुम्हाला भविष्यात चुकती करावी लागेल.
हे लाज नसलेलं सरकार
दरम्यान, रविकांत तुपकर यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी रविकांत तुपकर पोलिसांच्या गणवेशात आले होते. तुपकरांनी पेट्रोल स्वतःच्या अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी रोखून ताब्यात घेतले. रविकांत तुपकर म्हणाले की, हे लाज नसलेलं सरकार आहे, हे सरकार शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून फक्त घोषणा करत आहे. कृती शून्य आहे.
कापसासह सोयाबीन आणि पीक विम्याच्या प्रश्नांवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांपासून तुपकर हे भूमिगत असल्याने पोलिसांकडून शोधाशोध सुरु होती. त्यांनी कापूस सोयाबीन आणि पीक विम्याच्या प्रश्नासंदर्भात सरकारला 10 फेब्रुवारीचा अल्टिमेटम दिला होता. त्यामुळं आज रविकांत तुपकरांनी शेतकऱ्यांसह बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किंवा मुंबईच्या AIC पीक विमा कंपनीच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
इतर महत्वाच्या बातम्या