IT Park In Kolhapur: कोल्हापूर शहरात आयटी क्षेत्राच्या विकासासाठी मोठी संधी असूनही आजवर जागेअभावी रोजगारनिर्मितीला मर्यादा येत होत्या. मात्र आता ही अडचण दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आयटीपार्क स्थापनेसह आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली असून, त्यामुळे आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कोल्हापूर जिल्ह्यात आयटीपार्कसाठी जागा उपलब्धतेच्या प्रस्तावास मंजुरी दिल्याची माहिती दिली आहे. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. कोल्हापुरात शेंडा पार्क येथील आरोग्य व कृषी विभागाच्या जागा आयटीसह विविध शासकीय प्रयोजनांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव दीर्घकाळ प्रलंबित होता. या प्रस्तावासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.

Continues below advertisement

थेट लाभ स्थानिक युवक-युवतींना मिळणार

शेंडा पार्क येथील आयटीपार्कसह इतर शासकीय उपयोगांसाठी आवश्यक जागा देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात आयटीपार्कच्या माध्यमातून कोल्हापूरच्या विकासाचे नवे सुवर्णद्वार खुले होणार असल्याचा विश्वास आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, आयटी क्षेत्र विकसित झाल्यास हजारोंच्या संख्येने रोजगारनिर्मिती होणार असून त्याचा थेट लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक युवक-युवतींना मिळणार आहे. यासोबतच शहराच्या आणि जिल्ह्याच्या आर्थिक उत्पन्नातही लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. कोल्हापूर आयटी क्षेत्रासाठी पूरक असतानाही जागेअभावी मागे पडत असल्याचा मुद्दा आमदार राजेश क्षीरसागर यांनी मांडला होता. पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्नाद्वारे त्यांनी हा विषय विधिमंडळाच्या लक्षात आणून दिला होता. त्यावेळी राज्यमंत्री ना. इंद्रनील नाईक यांनी बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन सभागृहात दिले होते.

पत्रकात पुढे नमूद करण्यात आले आहे की, भारताला 2047 पर्यंत जागतिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे. त्यासाठी केंद्र शासनाने नीती आयोगाची, तर राज्य शासनाने ‘मित्र’ संस्थेची स्थापना केली आहे. मित्र संस्थेच्या माध्यमातून कोल्हापुरात शाश्वत विकास परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत फौंड्री, वस्त्रोद्योग, कृषी, आयटी आणि पर्यटन या पाच प्रमुख क्षेत्रांच्या विकासावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला. मित्र संस्थेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी धोरणात्मक योजना आखण्यात आल्या असून, महा स्ट्राइड प्रकल्पांतर्गत जिल्ह्यांची विकासक्षमता ओळखून स्ट्रॅटेजिक प्लॅन राबवला जात आहे. याच अनुषंगाने आयटी क्षेत्राशी संलग्न डेटा सेंटर उभारण्याचे नियोजनही शासनाने केले आहे. डेटा सेंटरसह आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण झाल्यास आयटी क्षेत्राचा सर्वांगीण विकास शक्य होणार आहे.

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या