Kolhapur Rajaram Sakhar Karkhana : राजाराम साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर राजकीय गट असलेले महाडिक आणि सतेज पाटील गट आमनेसामने आले आहेत. मुद्यावर आणि शेतीसमोर असलेल्या आव्हानांवर टिकाटिप्पणी होण्याऐवजी ही लढाई आता वैयक्तिक पातळीवर येऊन पोहोचली आहे. विशेष करून अमल महाडिक आणि सतेज पाटील यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. खासदार धनंजय महाडिक यांनीही आज सतेज पाटील यांच्यावर जहरी टीका केल्याने प्रचार संपेपर्यंत आणखी यामध्ये भर पडत जाणार आहे यात शंका नाही. 


राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आमदार सतेज पाटील यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडील राजारामची सत्ता काढून घेण्यासाठी कंबर कसली आहे. अर्ज छाननीमध्ये विरोधी आघाडीचे 29 उमेदवार अवैध झाल्यानंतर सतेज पाटील यांनी महाडिक भ्यालेत (घाबरले) अशा शब्दात हल्ला चढवला आहे. गुरुवारी (13 एप्रिल) एका प्रचारसभेत सतेज पाटील यांनी त्याचा पुनरुच्चार करत महाडिकांवर हल्लाबोल केला. त्यानंतर आज अमल महाडिक यांनीही आजच (14 एप्रिल) बिंदू चौकात सात वाजता येण्याचे जाहीर आव्हान दिले आहे. 


सतेज पाटील काय म्हणाले होते?


सतेज पाटील म्हणाले होते की, मी 100 टक्के म्हणतो या व्यासपीठावर नव्हे, तर बिंदू चौकात सांगेन, महाडिक भ्यालेत, भ्यालेत, 100 टक्के भ्यालेत. भ्याले नसतील, तर छाननीमध्ये अर्ज उडवण्याचे कारण काय? अमल महाडिक म्हणाले, महाडिक भ्याले नाहीत. महाडिक घरी गेल्यानंतर बंटी पाटील घरातून बाहेर पडले नाहीत. बाळ तू लहान आहेस. मी घरातून बाहेर न पडणारा पाटील नाही. मी त्यादिवशी पुण्यात होतो. मी जर असतो, तर काय झालं असतं हे निश्चित कोल्हापूर जिल्ह्यानं बघितलं असतं. 


सतेज पाटलांच्या आव्हानावर अमल महाडिक काय म्हणाले?


अमल महाडिक आज (14 एप्रिल) प्रचार शुभारंभात म्हणाले की, आम्हाला धमकी दिली तरी आम्ही घाबरत नाही आणि बावड्यात येऊन फिरणारच. सतेज पाटील लिमिटमध्ये रहा आणि लिमिटबद्दल बोला. आम्ही तुमच्या वडीलधाऱ्या माणसांवर बोलत नाही. मात्र, तुम्ही महादेवराव महाडिक यांच्यावर बोलणं बंद करा अन्यथा जशास तसं उत्तर देऊ. बिंदू चौकात 7 वाजता येतो, तुम्ही देखील या. तुमच्या सोबत बोलणारे लोक तुमचे घात करणार आहेत. निवडणूक लागली की, तुम्ही सभासदांच्या घरी जात असता, आम्ही त्यांच्या सुखदुःखात सहभागी असतो. आमच्या सभासदांचा स्वाभिमान दुखावण्याचा प्रयत्न करू नका, असा इशाराही त्यांनी दिला. 


आम्ही 37 वर्षाचे अहवाल तुम्हाला दाखवतो, तुम्ही एक वर्षाचे दाखवा. तुमची भाषा मग्रुरीची आणि खोटारडेपणा हे तुमचं सूत्र आहे. सतेज पाटील पहिल्यांदा तुम्हाला आमदार केलं ते महादेवराव महाडिकांनी. विधानपरिषदेला मी माघार घेतली म्हणून तुम्ही आमदार झाला. 


सतेज पाटील आव्हान स्वीकारणार का?


सतेज पाटील यांनी आव्हान दिल्यानंतर अमल महाडिक यांनीही या बिंदू चौकात म्हटल्याने सतेज पाटील काय उत्तर देतात? याकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या