Rajaram Sakhar Karkhana : राजाराम साखर कारखाना निवडणुकीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचार शुभारंभात सत्ताधारी आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी बंटी पाटलांना आमदार करणे आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती, अशा शब्दात हल्लाबोल केला होता. आता या टीकेवरून कारखान्याच्या परिवर्तन आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी पलटवार केला आहे. 2005 मध्ये मी आणि पी. एन. पाटील नसतो तर काय झालं असतं हे महाडिकांनी सांगावं, असे टोला लगावला आहे. प्रचार सभेत बोलताना त्यांनी महाडिक गटाला लक्ष्य केले.


बेफाम, खोटं आणि रेटून बोलायचं ही महाडिक प्रवृत्ती 


बेफाम, खोटं आणि रेटून बोलायचं ही महाडिक प्रवृत्ती आहे. एका गावातील तीन उमेदवार म्हणता मग एका घरातील दोन उमेदवार कसे काय? पावणे दोन लाखांनी कोल्हापूरच्या जनतेने तुमचा पराभव केलाय, तुमच्या टीकेला उत्तर देण्याची गरज वाढत नाही. 28 वर्षे त्यांच्याकडे कारखाना दिला आता 5 वर्षे हा कारखाना आमच्याकडे देऊन बघा, मी किती मोठा आहे, माझी ताकद काय आहे याचे उत्तर 23 तारखेनंतर देईन आज ती वेळ नाही, असे आव्हानही त्यांनी दिले. 


ते म्हणाले की, अनेक आंदोलनानंतर राजाराम कारखाना सहकारी झाला आहे, पण 28 वर्षांमध्ये हा कारखाना सहकारी राहिला का? हा प्रश्न उपस्थित होतो.  हा खासगी झाला तर त्याचे पाप माझ्यावर नको, म्हणून मी निवडणुकीच्या रिंगणात आहे. कारखाना आणि महाडिक यांचा काही संबंध नाही, आयते आले आणि मालक झाले. 


महादेवराव महाडिकांना टोला 


ते पुढे म्हणाले की, मला आमदार केलं म्हणता, त्यावेळी मला फक्त एकच मत पडलं होतं का? 2005 साली मी आणि पी एन पाटील नसतो तर काय झालं असतं हे महाडिक यांनी सांगावं. त्यांनी खासदार धनंजय महाडिक यांनाही टोला लगावला. गेले महिनाभर संसदरत्न खासदार मंत्रिपदासाठी दिल्लीत ठाण मांडून आहेत. तुमच्या कालच्या भाषणावर सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया आहेत ते तुम्हीच बघा मला बोलायची गरज नाही. एफआरपी दिली नाही म्हणून भीमा कारखान्यावर कारवाई सुरु असताना त्यांनी सहकारावर बोलायचं हे दुर्दैव आहे. 


शेअर्स गोळा करताना हे कोणीही नव्हते


ते पुढे म्हणाले की, कारखाना शेअर्स गोळा करताना हे कोणीही नव्हते. करार राजाराम कारखान्याचा, वाहन राजारामची आणि ऊस बेडकिहाळ कारखान्याला अशी स्थिती आहे. सतेज पाटील बिंदू चौकात कारखान्याचा वाद पोहोचल्यानंतर भाष्य केले. ते म्हणाले की, त्या दिवशी आंबेडकर जयंती होती, तिथं काही घडलं असतं तर माझ्यावर जबाबदारी होती. मला माझ्या जबाबदारीची जाणीव आहे, कारण मी या मातीतील आहे. महाडिक हे येल्लूरचं पार्सल आहे. डी. वाय. पाटील कारखान्याची निवडणूक लागल्यावर त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बंटी पाटील समर्थ आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या