Rajaram Sakhar Karkhana : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा बावड्यातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सतेज पाटील गटाला तगडा झटका बसला आहे. साखर कारखानाच्या पोटनियमातील तरतुदीनुसार सत्ताधारी गटाकडून हरकती घेण्यात आलेल्या विरोधी गटातील उमेदवारांसह एकूण 29 उमेदवार अपात्र ठरले आहेत. त्यामुळे सत्तांतरासाठी कंबर कसलेल्या पाटील गटाला तगडा झटका बसला आहे.
राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी अध्यक्ष सर्जेराव माने, बाजीराव पाटील, उत्तम चव्हाण यांच्यासह विरोधी गटातील 29 उमेदवारांवर सत्ताधारी गटांकडून तर तानाजी कृष्णा पाटील या सत्ताधारी गटातील उमेदवारावर विरोधी गटाकडून हरकत घेण्यात आली होती. मंगळावरी दोन्ही गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला होता. आज (29 मार्च) अंतिम पात्र उमेदवारांची यादी जाहीर झाली. यामध्ये पोटनिमातील तरतुदीनुसार एकूण 29 उमेदवार अपात्र ठरले आहेत.
अर्ज छाननीवेळी सत्ताधारी आणि विरोधी गटामध्ये शाब्दिक बाचाबाची
राजाराम कारखान्याच्या अर्ज छाननीवेळी सत्ताधारी आणि विरोधी गटामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती. कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे सुद्धा प्रकार घडले. बनावट अर्ज करुन विरोधी उमेदवारांवर हरकत घेतली असा आरोप आमदार सतेज पाटील गटाकडून, तर विरोधकांकडून हकरतदारांवर दबाव टाकला जात असल्याची भूमिका महाडिक गटाने घेतली होती. दरम्यान, सर्वसाधारण गटातील 15, महिला प्रतिनिधी गटातील 2 तर संस्था प्रतिनिधी, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि भटक्या विमुक्त गटातील प्रत्येकी एक अशा 21 जागांसाठी निवडणूक होत आहे. संस्था गटाचे 129 तर 13409 अ वर्ग सभासद असे 13538 सभासद मतदानासाठी पात्र आहेत. निवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार, 12 एप्रिल हा अर्ज माघारीचा अखेरचा दिवस आहे. त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल.
राजाराम कारखान्यावर गेल्या 28 वर्षांपासून महाडिकांची सत्ता
दरम्यान, राजाराम कारखान्यावर गेल्या 28 वर्षांपासून माजी आमदार महादेवराव महाडिक गटाची सत्ता आहे. त्यामुळे कारखान्यात सत्तांतर करण्यासाठी सतेज पाटील यांनी रणशिंग फुंकले आहे. गेल्या निवडणुकीमध्ये थोड्या फरकाने सतेज पाटील पॅनेलचा पराभव झाला होता.
इतर महत्वाच्या बातम्या