Kalamba Jail : कोल्हापुरातील (Kolhapur) कळंबा जेलमध्ये मोबाईल अन् गांजा सापडण्याचे प्रकार सुरुच आहे. आता पुन्हा एकदा एक मोबाईल हॅण्डसेट, चार्जर आणि बॅटरी सापडल्याने खळबळ उडाली आहे. सर्कल नंबर चार विभक्त कोठडी क्रमांक 13 व 14 च्या मागील ड्रेनेजमध्ये मोबाईल साहित्य आढळून आले. या प्रकारानंतर जेल प्रशासनाकडून अज्ञात कैद्याविरुद्ध जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. सापडलेले साहित्य जप्त करुन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मागील आठवड्यामध्येही कळंबा जेलमध्ये (Kalamba Jail) जेलच्या शेतामध्ये गांजा, मोबाईल हॅण्डसेट, चार्जर, दोन डेटा केबल मिळून आल्या होत्या. तो तपास सुरु असतानाच आता पुन्हा मोबाईल हॅण्डसेट, चार्जर आणि बॅटरी मिळाल्याने कळंबा जेलमध्ये नेमकं काय चाललं आहे? अशीच विचारणा होत आहे. 


सर्वच बरॅकमधील कैद्याची झडती 


मागील आठवड्यात झालेल्या प्रकारानंतर कळंबा जेलमध्ये विशेष दक्षता पथकाकडून सर्वच बरॅकमधील कैद्यांची झडती घेण्यात आली. ही झडती सुरु असतानाच सर्कल नंबर चारमधील विभक्त कोठडी क्रमांक 13 व 14 च्या पाठीमागील ड्रेनेजमध्ये हॅण्डसेटसह चार्जर आणि बॅटरी मिळाली. या सर्व पार्श्वभूमीवर जेलमध्ये कोणत्या कैद्याची विशेष बडदास्त ठेवली जात आहे गांजाची नशा कोण करत आहे? या प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत. 


कळंबा जेलमध्ये गुन्ह्याची मालिका


दरम्यान, मागील महिन्यात सीपीआरमध्ये उपचारासाठी आणल्यानंतर पोलीस आणि डाॅक्टरांच्या हाती तुरी देऊन पसार झालेल्या कैद्याला तब्बल साडेसात तासांच्या शोधमोहिमेनंतर अटक करण्यात आली होती. पळून गेल्यानंतर तो ऊसात लपला होता. मात्र, संध्याकाळ झाल्यानंतर ऊसातून बाहेर पडून जात असताना पोलिसांनी त्याला ओळखून पकडले होते. फेब्रुवारी महिन्यात कळंबा जेलमध्येच भयंकर घटनेत एका कैद्याने दुसऱ्या कैद्याचा खून केला होता. सतपालसिंह जोगेंद्रसिंह कोठडा असे मयत कैद्याचे नाव आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या