कोल्हापूर: इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोन करुन धमकावणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानजनक टिप्पणी करण्याचा ठपका असलेल्या प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे प्रशांत कोरटकर याचा कोल्हापुरातील मुक्काम वाढला आहे. प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) याला कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने सोमवारी दुपारी तेलंगणात अटक केली होती. त्याला घेऊन पोलीस पथक कालच कोल्हापूरच्या (Kolhapur News) दिशेने रवाना झाले होते. हे पथक कोरटकरला घेऊन मंगळवारी सकाळी कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यानंतर दुपारी 12 च्या सुमारास  प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर जिल्हा न्यायालयात नेण्यात आले. 


न्यायालयातील सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी प्रशांत कोरटकर याच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्याच्या आवाजाचे नमुने घ्यायचे असून त्याच्या चौकशीसाठी सात दिवसांची कोठडी हवी असल्याचे सरकारी वकिलांनी म्हटले होते. मात्र, जिल्हा न्यायालयाने प्रशांत कोरटकर याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. न्यायमूर्ती एस.एस. तट यांनी हा निर्णय दिला. त्यामुळे एरवी थाटात राहणाऱ्या प्रशांत कोरटकर याला आणखी तीन दिवस कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात काढावे लागणार आहेत. प्रशांत कोरटकर हा तब्बल गेल्या महिनाभरापासून फरार होता. कोल्हापूर पोलिसांची पथके त्याचा कसून शोध घेत होती. आता प्रशांत कोरटकर याची पोलीस कोठडी मिळाल्यामुळे चौकशीत तो काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 


दरम्यान, प्रशांत कोरटकर याला पोलीस ठाण्यातून न्यायालयात नेताना आणि परत आणताना कोल्हापुरातील शिवप्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती. शिवाजी महाराजांविषयी अपमानजक टिप्पणी करणाऱ्या कोरटकर याला धडा शिकवण्यासाठी अनेकांना कोल्हापुरी वहाणा आणल्या होत्या. या वहाणांनी प्रशांत कोरटकर याला बडवण्याचा बेत शिवप्रेमींनी आखला होता. मात्र, पोलीस ठाणे आणि न्यायालयाच्या आवारात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केल्यामुळे आंदोलकांना प्रशांत कोरटकरपर्यंत पोहोचता आला नाही. प्रशांत कोरटकर यांना सुनावणी झाल्यानंतर न्यायालयातून बाहेर आणत असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर चप्पल फेकली. मात्र, पोलिसांनी तात्काळ या व्यक्तीला रोखत ताब्यात घेतले.



आणखी वाचा


सट्टा व्यावसायिकाला भेटला, जामीन रद्द होताच चंद्रपूरच्या हॉटेलमधून तेलंगणाला पळ काढला, टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमुळे प्रशांत कोरटकर सापडला


शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, दोन्ही बाजूच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, वाचा शब्द जसाच्या तसा