कोल्हापूर: शिवरायांचा अपमान करणाऱ्या आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. प्रशांत कोरटकरला 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. तसेच पोलिस ज्या वेळी तपासासाठी बोलावतील त्यावेळी हजर रहावं लागेल अशीही अट ठेवण्यात आली आहे. 

Continues below advertisement

कोल्हापूर सत्र न्यायालयाने जामीन देताना प्रशांत कोरटकर समोर तीन महत्त्वाच्या अटी ठेवल्या आहेत. त्याचं उल्लंघन केल्यास त्याला पुन्हा तुरुंगात जावं लागेल. 

प्रशांत कोरटकर समोर तीन अटी कोणत्या?  

1. पन्नास हजार रुपयांचा जात मुचलका2. तपासासाठी ज्या ज्या वेळी पोलिस बोलावतील त्या त्यावेळी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात हजर राहणे.3. या प्रकरणातील फिर्यादी आणि साक्षीदार यांना धमकवायचं नाही. 

Continues below advertisement

कोरटकरला पोलिस सुरक्षा द्या, वकिलांची मागणी

या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान प्रशांत कोरटकरवर दोन वेळा हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे त्याला नागपुरातील घरी सुरक्षित पोहोचेपर्यंत पोलिस बंदोबस्त द्यावा अशी मागणी त्याच्या वकिलांनी केली आहे. या संबंधी प्रशांत कोरटकरच्या वकिलांकडून कोल्हापूर पोलिस अधीक्षकांना विनंती अर्ज देण्यात येणार आहे. 

कोरटकरचा अजून दोन दिवस तुरुंगातच मुक्काम?

जामीन मिळाला तरी देखील प्रशांत कोरटकरचा आणखी दोन दिवस कोल्हापुरातील कळंबा जेलमध्येच मुक्काम होऊ शकतो. ज्या कनिष्ठ कोर्टासमोर जामीनदार उभा करायचा असतो त्या कनिष्ठ कोर्टाचे प्रमोशन झाल्याने ते कोर्ट रिकामे आहे. बुधवारी सुट्टीच्या दिवशी इंचार्ज कोर्ट उपस्थित राहिले तर प्रक्रिया होऊ शकते.

माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत, इंद्रजीत सावंतांची प्रतिक्रिया

या प्रकरणी इंद्रजीत सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या व्यक्तीला कुणीही क्षमा करू शकत नाही. आता कोर्टाने त्याला अटी आणि शर्तीसह जामीन मंजूर केला आहे. या अटी आणि शर्तींचे पालन होते की नाही हे आम्ही पाहणार आहोत. या प्रकरणात अजून तपास करण्याचा आहे. माझ्या काही प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत. फोन करत असताना कोरटकर याच्याबरोबर कोण होतं हे तपासणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर माझा नंबर कोरटकरला कुणी दिला हे देखील समजणे महत्वाचे आहे." 

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज त्याचबरोबर महापुरुषांच्याबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांच्या संदर्भात जर केंद्र सरकार कायदा करत असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे असंही इंद्रजीत सावंत म्हणाले.