Raju Shetti : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नुकताच कोल्हापूर दौरा पार पडला. तत्कालीन मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांचा विरोध असेल तर शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, अशी भूमिका विधानसभा निवडणुकीपूर्वी घेतली होती. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीचे सर्वच्या सर्व आमदार निवडून आले. मात्र महायुती पुन्हा एकदा सत्तेत येताच शक्तिपीठबाबत धोरण बदललं असून कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ करायचा असा निर्धार सरकारकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा 12 जिल्ह्यातून विरोध असतानाही शक्तीपीठ रेटला जात असताना शेतकरी सुद्धा आक्रमक झाला आहे. दरम्यान कोल्हापूरमध्ये सुद्धा अत्यंत आक्रमक पद्धतीने शक्तीपीठला विरोध होत आहे. 

या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर येत असल्याने शक्तीपीठ विरोधक आंदोलकांनी विरोध करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यापूर्वीच कार्यकर्त्यांची धरपकड करून त्यांचा विरोध मोडून काढण्यात आला दरम्यान, या विरोध करणाऱ्यांमध्ये शक्तिपीठ आंदोलनातील गिरीश फोंडे यांचाही यांचाही समावेश होता. त्यांनी सुद्धा कुणाल कामराच्या विडंबन गीताचा संदर्भ देत एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली होती. तसेच त्याच गाण्यांमध्ये शेतकऱ्यांचे शब्द घालून विरोध करणार असल्याचे म्हटलं होतं. मात्र आता गिरीश फोंडे मनपा शिक्षक असल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यांचे तडकाफडकी निलंबन झाल्याने शेतकरी आंदोलक आक्रमक झाले आहेत. 

टक्केवारीच्या तुकड्यांवर जगलेल्या महापालिका अधिकाऱ्यांनी निलंबित केले

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलक गिरीश फोंडे यांच्या निलंबनानंतर हल्लाबोल केला आहे. राजू शेट्टी म्हणाले की, कॉम्रेड गिरीश फोंडे यांच्यासारख्या चळवळीतील कार्यकर्त्याला सरकारच्या विरोधात बोलले म्हणून राजकीय दबावापोटी टक्केवारीच्या तुकड्यांवर जगलेल्या महापालिका अधिकाऱ्यांनी सहाय्यक शिक्षक पदावरून तडकाफडकी निलंबित केले. यावरून राज्याच्या राजकारणाची पातळी किती खालच्या दर्जाला गेली आहे हे सामान्य जनतेच लक्षात येऊ लागलं आहे. राज्यातील राज्यकर्ते षंड झाले आहेत हे सिद्ध झालं आहे. 

शक्तीपीठ महामार्गातून 50 हजार कोटी हाणायचा तुमचा डाव

यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात राज्यकर्ते अशा पद्धतीने चळवळी संपवण्यासाठीच काम कितीही जोमाने केले तरी त्याच जोमाने आम्ही लढत राहू. मात्र, राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे सत्तेच्या जीवावर अतिरेक करून तुम्ही ज्या भानगडी व कारनामे करत आहात हे जनतेला माहिती आहे. शक्तीपीठ महामार्गातून किमान 50 हजार कोटी हाणायचा तुमचा डाव आहे. जेव्हा तुमची सत्ता जाईल तेव्हा ही जनता तुम्हाला भर चौकात पायाखाली तुडवायला मागे पुढे बघणार नाही, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला. 

इतर महत्वाच्या बातम्या