कोल्हापूर : शिवसेना चिन्हावर निवडून आल्यानंतर शिंदे गटामध्ये प्रवेश केलेल्या हातकणंगलेतील (Hatkanangle Lok Sabha Constituency) खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांच्याविरोधात मतदारसंघांमध्ये चांगलाच रोष आहे. त्यांना गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात भर रस्त्यात अडवून जाब विचारण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, आता थेट भाजपचे सहयोगी अपक्ष आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांनी सुद्धा माने यांच्यावर तोफ डागली आहे. त्यामुळे माने यांच्या आगामी लोकसभेच्या तोंडावर अडचणी वाढत चालल्या आहेत का? असाच प्रश्न उपस्थित झाला आहे.
जिल्ह्यातील दोन मंत्र्यांचा आम्हाला खूपच त्रास
आवाडे म्हणाले की, भाजपमध्ये आम्हाला लांब ठेवून राजकारण सुरू आहे. ते कोण करत आहे याची सगळ्यांना माहिती आहे, असे म्हणत त्यांनी भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनाही टोला लगावला. शिरदवाड (ता.शिरोळ) येथील रस्ते कामाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना आवाडे यांनी जोरदार फटकेबाजी केली. यड्रावकर साहेब तुम्ही सत्तेत होता, मंत्री होता. परंतु तुमचा आम्हाला कधीच त्रास झाला नाही. मात्र, जिल्ह्यातील दोन मंत्र्यांचा आम्हाला खूपच त्रास झाल्याचेही आवाडे म्हणाले. हा त्यांचा रोख सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्याकडे होता.
लोक हळूच मनात आहेत, याला बदला
भाजपच्या घरोघरी चाललेल्या कार्यकर्त्यांना विचारा, लोक हळूच मनात आहेत, याला बदला, अशा शब्दात आवाडे यांनी टीका केली आहे. आवाडे यांनी माने यांच्यावर तोफ डागतानाच मोदी यांचं कौतुक केलं. ते म्हणाले की, देशात तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार यामध्ये दुमत नाही, परंतु इथं कोण देणार? त्यांनी आतापर्यंत जनतेला काय दिलं? असा प्रश्न लोक विचारत असल्याचे आवाडे म्हणाले. याबाबत तुमचे आणि आमचे वरिष्ठ नेते काय तो निर्णय घेतील. आम्ही काय कुणाला बदला म्हणत नाही. वरिष्ठ जो निर्णय देतील, त्याच्या पाठीशी आम्ही राहणार आहे. आवाडे यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ मतदारसंघामध्ये चर्चेचा विषय झाला असून तो सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल होत आहे.
त्यामुळे एक प्रकारे धैर्यशील माने यांना कडाडून विरोध करत आवाडे यांनी आपल्या मुलासाठी उमेदवारीसाठी बोलणी सुरु केली नाहीत ना? अशी सुद्धा चर्चा दुसऱ्या बाजूने रंगली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघांमध्ये चांगलीच चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीकडून ही जागा सोडून राजू शेट्टी यांचा मार्ग मोकळा केला जाईल, असं बोललं जात आहे. या मतदारसंघांमध्ये ठाकरे यांनी स्वतः लक्ष घातलं असून शत्रूचा शत्रू तो आपला मित्र अशा पद्धतीने धैर्यशील माने यांना पराभूत करण्यासाठी कंबर कसली आहे. मध्यंतरी राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती.
इतर महत्वाच्या बातम्या